सांगली : वर्षभरात १२बिबट्यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 leopards

सांगली : वर्षभरात १२बिबट्यांचा मृत्यू

शिराळा : शिराळा तालुक्यात आतापर्यंत ८ व वाळवा तालुक्यात ४ अशा एका वर्षात १२ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी उद्यानात नेत असताना दोन तर उद्यानाबाहेर १० बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाहनाच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू होण्याची संख्येत वाढ होऊ लागली आहे. एकंदरीत बिबट्यांच्या मृत्यूची वाढती संख्या चिंताजनक असून याबाबत वन विभागाकडून ठोस कारवाई अपेक्षित आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा वावर हा कायमचाच आहे. त्यातील काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले ते बाहेरच राहिले आहेत. त्यांचा वावर हा चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून ६० कि.मी. अंतरापर्यंत आहे. शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असल्याने बिबट्याला राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. परंतु, काहीवेळा त्यांना पुरेशे अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. त्यामुळे मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळपूर, कुसाईवाडी, मांगले, मिरखेवाडी, बेरडेवाडी, कांदे, शिंगटेवादी परिसरातील पाळीव प्राण्यावर हल्ले करून त्यांना ठार मारले आहे. शेडगेवाडी-खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतुवरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता.

१४ सप्टेंबर २००४ खेड तालुक्यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर जातीच्या बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. २०१६ ला वाकाईवाडी येथे २ तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता १ जानेवारी २०१५ ला कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इटकरे व शेडगेवाडी येथे बिबट्याचा मृत्यू झाला होता. मे २०२० मध्ये वाकुर्डे बुद्रुक येथे बिबट्याच्या बछड्याचा वाहन अपघातात मृत्य झाला. त्यानंतर काळामवाडी येथे अपघातात मृत्यू झाला होता. नुकताच २७ फेब्रुवारी २०२२ ला रेठरे धरण येथे बिबट्याचा मृत्यू झाला होता. काल नेर्ले येथे वाहन धडकेत मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

नेर्लेनजीक महामार्गावर बुधवारी बिबट्या ठार

नेर्ले; येथील आशियाई महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या मादी जातीचा बिबट्या ठार झाला. ही घटना बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. महामार्गावर अपघात होताच महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या कासेगाव पोलिसांनी व विभागास तत्काळ माहिती दिली यावेळी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी मृत बिबट्याला इस्लामपूर येथे नेले.

वाळवा तालुक्यात आशियाई महामार्गावर अपघातात बिबट्या ठार होण्याची ही तिसरी घटना आहे. वन क्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे, वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. डॉ. अंबादास माडकर यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर बिबट्याचे दहन करण्यात आले.

Web Title: Sangli 12 Leopards Die During Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top