सांगली जिल्ह्यात एसटीकडून 62 कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत 

घनश्‍याम नवाथे 
Wednesday, 30 September 2020

कोरोना आपत्तीचे कारण देत एस. टी. महामंडळाच्या रोजंदार गट क्रमांक 1 व 2 मधील जिल्ह्यातील 62 एसटी कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, अनुकंपा, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक कर्मचारी यांना कामावरून कमी करून सेवा खंडित केली आहे.

सांगली : कोरोना आपत्तीचे कारण देत एस. टी. महामंडळाच्या रोजंदार गट क्रमांक 1 व 2 मधील जिल्ह्यातील 62 एसटी कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, अनुकंपा, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक कर्मचारी यांना कामावरून कमी करून सेवा खंडित केली आहे. तसेच 35 कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रक यांनी त्वरित कार्यमुक्त केले आहे. याविरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोना आपत्तीचे कारण देत नियमित एसटी कर्मचाऱ्यांना रजा देऊन रोजंदार कर्मचारी यांचा वापर केला जाणार नसल्याचा अन्यायकारक आदेश एसटी महामंडळाने पारीत केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 62 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत सेवा खंडीत केली आहे. तसेच 35 कर्मचाऱ्यांना त्वरीत कार्यमुक्त केले आहे. तसेच जे कर्मचारी बदली / वर्ग केलेल्या ठिकाणी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करून कार्यमुक्त करण्यात येईल, असा अन्यायकारक आदेश विभाग नियंत्रक यांनी पारित केला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

अतिरिक्तच्या नावाखाली ज्या लिपिक कर्मचारी यांच्या बदल्या केल्या आहेत, त्या त्वरित रद्द करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागात तत्काळ रुजू करून घ्यावे. ज्यांना सेवा अतिरिक्तच्या नावाने थांबविले आहे, त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे. तीन महिने विनाकारण अतिरिक्त घोषित करून घरी बसवलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे. 

अनुकंपा कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांना तत्काळ सेवेत घ्यावे आदी मागण्या ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अमोल वेटम, गौतम भगत, आकाश कांबळे, अमित वेटम, तौफिक मुल्ला आदींनी मुख्यमंत्री, राज्य परिवहन मंत्री यांचेकडे केलेली आहे. तसेच 5 ऑक्‍टोबरला मुंबईत महाव्यवस्थापक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangli, 62 employees were disconnected from ST