सांगली : चरी बुजवण्याचे पैसे गेले कोठे?

स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनीही प्रशासनाला इंगा दाखवण्याचा इशारा दिला
sangli
sanglisakal
Updated on

सांगली : शहरातील रस्ते खोदाईनंतर चरी बुजवण्यासाठी चार कोटींच्या नव्याने निविदा, काळी खण सुशोभिकरणासाठी वाढीव ७० लाख, मदनभाऊ पुतळ्याजवळील चौकाच्या रुंदीकरणासाठी ५० लाखांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. चरी बुजवण्यासाठी आलेले पैसे अन्यत्र खर्च केल्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

स्थायी समितीतील सदस्यांना, त्यांच्या निर्णयांना प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचा हल्ला करण्यात आला. स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनीही प्रशासनाला इंगा दाखवण्याचा इशारा दिला. संतप्त सभापतींनी येत्या ३१ ऑगस्टपूर्वी चरींची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही दिली.

आपल्याला हवी ती कामे प्रशासन विनानिविदा करते, मात्र स्थायी सदस्यांनी सुचवलेल्या कामांना केराची टोपली दाखवली जाते. याचा उदाहरणासहीत संतोष पाटील यांनी पंचनामा केला. आपटा पोलिस चौकीजवळील शाळेला पत्रे घालण्याचे आठ लाख रुपयांचे काम कोणत्या निविदेद्वारे सुरू आहे, असे विचारले. प्रशासन केवळ दिखाऊ कामे करीत आहे. चरी बुजवण्यासाठी आलेले पैसे अन्यत्र खर्च करून प्रशासनाने पावसाळ्यात सारे खोदलेले रस्ते खड्ड्यात घातले आहेत.

मिरजेतील खराब रस्त्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. ठेकेदाराकडून ही कामे पुन्हा करावीत, अशी मागणी केली. भाजपच्या सदस्या सविता मदने यांनी सभापतींना त्यांच्या शहरातील रस्त्यांची अवस्था पाहा, असा सल्ला दिला. संतोष पाटील यांनी सभापती ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याची टीका केली. या दोघांमध्ये ‘तू तू ...मैं मैं..’ झाली. सभापती आवटी यांनी मोर्चा प्रशासनाकडे वळवला. येत्या ३१ ऑगस्टपूर्वी चरी बुजवण्यासाठी कार्यवाही करा, अन्यथा इंगा दाखवावा लागेल. आमचा इतिहास प्रशासनाला अंगावर घेण्याचा आहे,

हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला. बैठकीत काळ्या खणीच्या सुशोभिकरणासाठी वाढीव ६० लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. सध्या हे काम प्रगतिपथावर आहे. नेते मदन पाटील पुतळ्याजवळील चौकाच्या रुंदीकरणाचा निर्णय झाला. त्यासाठी ५० लाख रुपयांची निविदा काढण्यास मंजुरी देण्यास आली. मोकाट कुत्री आणि जनावरांच्या प्रश्‍नावरही बैठकीत जोरदार चर्चा झाली. जनावरे पकडली तर त्यासाठी कोंडवाड्यात चारा नाही.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी नाहीत. नसबंदीचा ठेका बंद पडला आहे, तेच स्मशानभूमीतील अंत्यविधी साहित्याच्या ठेक्याबाबत झाले आहे, महापालिकेच्या दळभद्री कारभाराने नागरिकांचे शिव्याशाप सदस्यांना झेलावे लागत असल्याची व्यथा संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, सविता मदने यांनी मांडली.

४ कोटींची निविदा काढली गेली

३१ ऑगस्टपूर्वी चरींची निविदा प्रक्रिया पूर्णची ग्वाही

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, अंत्यविधी साहित्याच्या ठेक्यावरही चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com