
सांगली : येथील अंडाबुर्जी गाडीचालक संतोष तुकाराम पवार (वय २८, मोती चौक) याच्या खुनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छडा लावला. संशयित आकाश सचिन शिंदे (वय १९, रा. आजना मशीदसमोर), आकाशचा चुलतभाऊ वैभव राजू शिंदे (वय २३, जयसिंगपूर, गल्ली नं. ११), निहाल बशीर नदाफ (वय २३), अकिब सरफराज नदाफ (वय २०, दोघे रा. पाटील गल्ली, उदगाव, ता. शिरोळ), सफवान जमीर बागवान (वय २१, असी मशीदजवळ, शंभरफुटी रस्ता, सांगली) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. खुनाच्या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांनाही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंडाबुर्जीचालक संतोष पवार आणि आकाश शिंदे यांच्यात काही दिवसांपूर्वी बस स्थानकावर दुचाकी घासून चालवण्यावरून वाद झाला होता. तेव्हा संतोषने आकाशला मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी संतोष याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकारानंतर संतोष आणि आकाश हे दोघेजण एकमेकाकडे बघत असताना खुन्नस दिल्याप्रमाणे बघत होते. संतोष हा खुन्नस देत असल्याच्या कारणावरून आकाश त्याच्यावर चिडून होता. आकाश हा सेंट्रिंग काम करत होता. त्याने चुलतभाऊ वैभव व साथीदारांच्या मदतीने संतोषचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार दोन दुचाकी (एमएच १०, डीएस ५२१४) व (एमएच ०९, ईएफ ४७५१) वरून आकाश आणि साथीदार काल सायंकाळी संतोषच्या अंडाबुर्जी गाड्यासमोर आले.
संतोष अंडाबुर्जीच्या तयारीत असतानाच गाड्याची तोडफोड करण्यास सुरवात केली. तसेच अंड्याचा ट्रे उचलून रस्त्यावर आपटला. संतोष विरोध करण्यास पुढे आला असता, त्याच्या पोटात चाकूने भोसकले. तो पळून जात असताना त्याला पकडून गाड्याजवळ आणून टाकले. त्यानंतर दोन दुचाकीवरून हल्लेखोर पसार झाले. या खुनाचा तपास विश्रामबाग पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते. निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या सूचनेनुसार पथक तपास करत असताना संशयित आरोपी कोल्हापूर रस्त्यावरील आदीसागर मंगल कार्यालयमागे अंगातील कपडे, खुनातील हत्यारे यांची विल्हेवाट लावण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने जाऊन छापा टाकून झुडपात लपलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग दिसले.
तसेच वैभव शिंदे याच्या हातावर जखम होऊन बँडेज बांधल्याचे दिसले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. सर्वांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, भगवान पालवे, कर्मचारी संकेत मगदूम, संदीप पाटील, संदीप गुरव, दीपक गायकवाड, राहुल जाधव, नागेश खरात, वैभव पाटील, अनिल कोळेकर, आर्यन देशिंगकर, संतोष गळवे, विनायक सुतार, रूपेश होळकर, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ यांच्या पथकाने कारवाई केली.
निवृत्तीच्या पूर्वसंध्येला छडा
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. काल खुनाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने छडा लावून पाच जणांना अटक केली. निरीक्षक गायकवाड यांनी ठाण्यातील दीड वर्षाच्या कारकिर्दीत ६ खून, ४ खुनी हल्ले, ७ दरोडे उघडकीस आणले. याशिवाय १०८ घरफोडीचे गुन्हे, ३९ चोरीचे गुन्हे, ६१ दुचाकी चोरीचे गुन्हे, २३ जबरी चोरीचे तसेच इतर अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. आज निवृत्तीच्या पूर्वसंध्येला खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.