सांगली बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांच्यासह सात संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, भाजप, कॉंग्रेस, स्वाभिमानीलाही झटका 

ncp photo
ncp photo

सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, खासदार संजय पाटील समर्थक दिनकर पाटील यांच्यासह अर्धा डझन संचालकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर सैरभैर झालेला, विखुरलेला मिरज तालुक्‍यातील कॉंग्रेसचा मोठा गट यानिमित्ताने राष्ट्रवादीत प्रवेशकर्ता झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला. 


उपसभापती तानाजी पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील (घोरपडे समर्थक), स्वाभिमानीचे कुमार पाटील, हमाल नेते बाळासाहेब बंडगर, दीपक शिंदे (डोंगरवाडी), वसंतराव गायकवाड (बेळंकी), जयश्री भीमराव पाटील (चोरोची), अजित बनसोडे (रांजणी), दयगोंडा बिरादार (संख) यांच्यासह सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, संतोषवाडीचे नेते खंडेराव जगताप यांनी पक्षप्रवेशकेला. या झटपट पक्षप्रवेशाच्या निमित्ताने बाजार समितीत मोठा उलटफेर झालाच, शिवाय राष्ट्रवादीने विरोधी भाजपसह कॉंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या मित्र पक्षांनाही झटका दिला. वसंतनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा प्रवेश झाला. त्यानंतर जयंतरावांनी संचालकांशी खासगीत गुजगोष्टी करत बाजार समितीला ताकद देण्याची ग्वाही दिली. 
माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या निधनानंतर मिरज पूर्व भागातील कॉंग्रेसचा गट अस्वस्थ होता.

काहीजण संजयकाका समर्थक म्हणून काम करत होते तर काहींनी आमदार सुरेश खाडे यांना "कामापुरता मामा' करून दगडाखाली सापडलेला हात सुरक्षित ठेवला होता. राज्यात भाजपची सत्ता आहे तोवर त्यांच्याशी जुळवून घेऊ, असे स्पष्ट धोरण होते. त्यांची सत्ता गेली आणि पुन्हा सारे अस्थिर झाले. त्यानंतर या गटाने राष्ट्रवादीत यावे, यासाठी सतत चर्चा सुरू राहिल्या. त्यातच बाजार समितीचे संचालक मंडळ मुदत संपल्यानंतर बरखास्त केले गेले आणि बऱ्याच चर्चेनंतर त्याला स्थगिती देत मुदतवाढीचा निर्णय झाला. हे घडत असताना राष्ट्रवादी प्रवेशाबाबतही चर्चा समोर आल्या. आज त्याला मुर्त स्वरुप आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत हा "कार्यक्रम' झाला. 


दिनकर पाटील म्हणाले, ""मदनभाऊंच्या निधनानंतर अनेकदा राष्ट्रवादीशी चर्चा होती. कॉंग्रेसमध्ये पोकळी होती. जिल्ह्यात सक्षम नेतृत्व, राज्य पातळीवर काम करणारे जयंत पाटील आहेत. मिरज पूर्व भागात साऱ्यांना एकत्र यावे, अशी चर्चा सुरु होती. एकूण परिस्थिती पाहता विकासाच्या मुद्यावर प्रवेश केला आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com