esakal | Sangali: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली : महापालिका

सांगली : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच आजही कायम राहिला. त्यामुळे विद्यमान विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे. इच्छुक नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा नेत्यांची भेट घेऊन आपला दावा सांगितला आहे.

सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी मिरजेचे नगरसेवक संजय मेंढे यांचे नाव काँग्रेसच्या नेत्यांनी निश्चित केले आहे. पलूस येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. मात्र महापालिकेच्या नगरसेवकांशी चर्चा न करता नेत्यांनी थेट निर्णय घेतल्यामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्यापूर्वी सदस्यांची मते जाणून घेणे आवश्यक होते, अशी नाराजी काँग्रेसचे नगरसेवक खासगीत व्यक्त करत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेता बदलाच्या पत्रावर सुमारे १४ नगरसेवकांनी स्वाक्षरीही केल्या आहेत.

हेही वाचा: रत्नागिरी : कारमधून रिव्हॉल्व्हर, ५ जिवंत राऊंड जप्त

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी काल मंगळवारी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. पक्षाने योग्य निर्णय न घेतल्यास वेगळा विचार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज पुन्हा त्यांनी श्रीमती जयश्री पाटील यांची भेट घेत विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी केली. आपल्या सोबत १२ नगरसेवक असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना राजीनामा देण्याचा आदेश नेत्यांनी दिलेला नाही. ते म्हणाले, पक्षाने मला पुरेशी संधी दिली आहे. त्यामुळे नेत्यांचा आदेश येताच मी राजीनामा देणार आहे. मात्र जोवर आदेश येत नाही, तोवर मी राजीनामा देणार नाही. नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे.

हेही वाचा: सांगली : थकीत बिलांसाठी काँट्रॅक्टर्सचे शुक्रवारी राज्यभर आंदोलन

कमी सदस्य असतानाही मिरजेला विरोधी पक्षनेतेपद

काँग्रेसच्या विद्यमान १९ सदस्यांमध्ये मिरजेचे चारच सदस्य आहेत. मग सांगलीचे जास्त सदस्य असताना विरोधी पक्षनेतेपद मिरजेला का? असा सवाल काँग्रेसचेच नगरसेवक उपस्थित करत आहेत. तीन वर्षांनी गटनेता बदलण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. त्याबाबत इच्छुकांची मते जाणून घेण्याची गरज वाटली नाही का असा मुद्दा उपस्थित झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी मंगेश चव्हाण यांच्याबरोबरच अभिजीत भोसलेही इच्छूक होते.

loading image
go to top