सांगली : बहुमत डावलून ‘करेक्ट कार्यक्रम’

राष्ट्रवादीकडून काँग्रेस, भाजपला कात्रजचा घाट
 सांगली
सांगलीsakal

सांगली: महापालिकेत गेल्या वर्षभरात सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादीने बहुमत डावलून विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे धोरण अवलंबले आहे. कालच्या महासभेत याचा पुन्हा प्रत्यय आला. काँग्रेस आणि भाजपला कात्रजचा घाट दाखवून राष्ट्रवादीने मनमानीपणाचा ठेका कायम ठेवला. या सर्व घडामोडीत पालिका प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत राहून राष्ट्रवादीला सहकार्य करत आहेत.

महापालिकेच्या विद्यमान सभागृहाला कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्ष ऑफलाइन महासभा घेता आली नाही. त्यामुळे अनेक नागरी प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा होत नव्हती. त्यातच महापालिकेत गेल्या वर्षी उलथापालथ होऊन सत्तांतरही झाले. तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी काँग्रेसच्या सहकार्याने महापौर झाले. तर सर्वाधिक सदस्य असतानाही भाजपला मात्र विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. या राजकीय साठमारीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पाठबळामुळे राष्ट्रवादीने गेल्या वर्षभरात आपलेच वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे घटक पक्ष असून काँग्रेसला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते पद असतानाही काँग्रेसला राष्ट्रवादीने नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. त्यांची अस्वस्थता काँग्रेस नगरसेवक सतत व्यक्त करूनही राष्ट्रवादीच्या वर्तणुकीत फरक पडताना दिसत नाही.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑनलाइन महासभेत गणपूर्ती नसताना (कोरम) सभा घेण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तब्बल शंभरावर विषय चर्चेला असताना आणि काँग्रेस-भाजपने विरोध केलेला असतानाही राष्ट्रवादीने ही सभा रेटून पार पाडली. विषय मंजूर करून घेतले. त्या विरोधात काँग्रेस-भाजपचे काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेवून सभा बेकायदेशीर ठरवण्याची मागणी केली. त्याचे इतिवृत्त कायम करू नये, अशी मागणी केली. ही बाब न्यायप्रविष्ठ असतानाही महापौरांना महासभा घेण्याचा घाट घातला. कालच्या झालेल्या महासेभत औचित्याचा मुद्दा (पॉईंट ऑफ ऑर्डर) भाजप व काँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. त्याकडे लक्ष न देता सभा चालवण्यास सुरूवात केली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे सदस्य आक्रमकपणे हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही सदस्य महापौरांचा बचावासाठी गेले होते. यानंतर महापौरांनी सभेतील विषय घाईगडबडीत मंजूर करत अवघ्या काही सेकंदात सभा गुंडाळली. आणि विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला.

राष्ट्रवादीच्या गेल्या वर्षभरातील कारभाराकडे पाहता त्यांनी संधी मिळेल, तिथे काँग्रेस-भाजपचे खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. निधी वाटपात भाजप-काँग्रेसच्या सदस्यांना डावलले आहे. मुळात महापालिकेत तिन्ही तांत्रिकदृष्ट्या सत्तेत आहेत. महापौर राष्‍ट्रवादीकडे असले, तरी स्थायी समिती आणि सभागृह नेते पद यांच्या समाजकल्याण व महिला बाल विकास समिती भाजपच्या ताब्यात आहे. तर काँग्रेसकडे उपमहापौर आणि विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे महापौर म्हणून सूर्यवंशी यांनी काँग्रेस आणि भाजपला ही सत्तेत सहभागी करून काम करण्याची आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच शहराच्या विकास कामांसाठी विश्‍वस्त म्हणून काम करताना तिन्ही पक्षांचा समन्वय साधून समाजहितेचे निर्णय घेण्याची गरज आहे; परंतु महापौर सूर्यवंशी यांच्याकडून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचेच

काम होत आहे.

पालकमंत्री फक्त राष्ट्रवादीचे का?

पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात विकास कामांचा धडाका लावला आहे; परंतु त्याचे श्रेय केवळ राष्ट्रवादीकडे जात आहे. याची उघड नाराजी काँग्रेस आणि भाजपचे सदस्य व्यक्त करत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांचे तिन्ही पक्षांतील सदस्यांशी चांगले संबंध आहेत. जाहीर भाषणातूनही ते याचा उल्लेख करतात. प्रत्यक्षात मात्र महापालिकेत केवळ राष्ट्रवादीचीच मक्तेदारी असल्याचे चित्र आहे. जयंत पाटील यांनी आपण केवळ राष्ट्रवादीचेच पालकमंत्री आहोत, असा संदेश जाऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सव्वा सव्वा वर्षाचे काय?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रिपणे वर्षभरापूर्वी सत्ता स्थापन केली. त्यावेळी सव्वा सव्वा वर्ष महापौर पद देण्यावर दोन्ही पक्षांनी मान्यता दिली होती. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची सव्वा वर्ष संपत आली आहेत. या सर्व कारभारानंतर आता पुन्हा महापौर बदलाची चर्चा काँग्रेसच्या गोटातून सुरू झाली आहे. मात्र, यासाठी काँग्रेसचे नेते किती ताकदीने प्रयत्न करणार हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य अस्वस्थ आहेत. सत्तेत असूनही लाभ मिळत नाही, याची खंत त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीकडून काँग्रेस, भाजपला कात्रजचा घाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com