सांगली : युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मनोज सरगर विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोज सरगर

सांगली : युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मनोज सरगर विजयी

सांगली: अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने राज्यात प्रथमच झालेल्या ऑनलाईन निवडणुकीत सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाच्या लढतीत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील गटाचे नगरसेवक मनोज सरगर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर राज्यमंत्री विश्‍वजित कदम गटाचे नगरसेवक मंगेश चव्हाण हे पराभूत झाले. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही विशाल पाटील गटाने बाजी मारली. युवक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मंत्री कदम गटाचे सुशील गोतपागर विजयी झाले.

अखिल भारतीय काँग्रेसकडून यंदा प्रथमच ऑनलाईन निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी मतदाराला ॲन्ड्रॉईड मोबाईलवर ॲप घेऊन चार मतांचा अधिकार देण्यात आला होता. एक नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

१२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर कालावधीत युवकांचे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. अडीच महिन्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आला.

सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मंत्री कदम गटाचे युवकचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मंगेश चव्हाण विरुद्ध विशाल पाटील गटाचे नगरसेवक मनोज सरगर यांच्यात खरी लढत होती. नेते मंडळीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. नगरसेवक सरगर यांनी २० हजार ४९५ मतांसह विजय मिळवला. कदम गटाचे मंगेश चव्हाण यांना १२ हजार ९७८ मते पडली. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. गीतांजली पाटील यांची महिला उपाध्यक्षपदी निवड झाली. तर उत्कर्ष खाडे, विनायक रूपनर, विनायक कोळेकर, योगेश भोसले, सलमान मेस्त्री, उमेश कनवाडे, श्रीनाथ देवकर यांची सरचिटणीसपदी निवड झाली. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी एकूण ३६ हजार ९३३ युवकांनी मतदान केले.

युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय प्रतिनिधीसाठी राखीव होते. जिल्हाध्यक्षपदासाठी ४७ हजार ८७७ मतदान झाले. युवकांनी मतदानाचा हक्क बजाविला. कदम गटाचे डॉ. सुशील गोतपागर यांनी ३३ हजार ६५५ मतांसह जिल्हाध्यक्षपदी बाजी मारली.

सांगली विधानसभा अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव होते. विशाल पाटील गटाचे हर्षद कांबळे यांनी ६ हजार ३७१ मतांसह विजय मिळवला. सुहेल बलबंड ३ हजार ४५० मतांसह उपाध्यक्ष झाले. मिरज विधानसभा अध्यक्षपदीदेखील विशाल पाटील गटाचे गणेश देसाई यांनी ७ हजार ८८० मते घेऊन विजयी झाले. कदम गटाचे संभाजी पाटील यांना ५ हजार ७५८ मते मिळवून उपाध्यक्षपदी निवडून आले.

दरम्यान, निकालानंतर विशाल पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण केली. शहरातून दुचाकी रॅली काढली.

निवडून आलेले पदाधिकारी-

युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष

जिल्हाध्यक्ष - सुशील गोतपागर

शहर जिल्हाध्यक्ष - मनोज सरगर

सांगली विधानसभा - हर्षद कांबळे

मिरज विधानसभा - गणेश देसाई

तासगाव - कवठेमहांकाळ - विशाल शिंदे

इस्लामपूर - पुष्पराज थोरात

जत - आकाश बनसोडे

खानापूर - अभिजित पाटील

पलूस- प्रमोद जाधव

शिराळा- रवींद्र कोकाटे

पडसाद उमटले-

ानिकालानंतर आज मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात एका बसवर दगडफेक करून संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पदाधिकारी व एसटी प्रशासनाने नुकसानभरपाईच्या अटीवर सामोपचाराने पडदा टाकला.

विशाल पाटील यांच्यावर ‘मॅनेज’चा आरोप-

निकालानंतर नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले, ‘शहर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत आम्ही ३७ हजार ५०० कार्यकर्त्यांची नोंदणी करून मतदान केले होते. आमच्याकडे सर्वांच्या पावत्या आहेत. मात्र, निकालाची प्रक्रियाच बोगसपणे राबवण्यात आली आहे. निकालही उशिराने लागला आहे. विशाल पाटील यांनी ही निवडणूक मॅनेज केली आहे. त्यामुळे फेर मतमोजणीची मागणी आम्ही वरिष्ठ पातळीवर करणार आहे. तसेच पुरावेही सादर करणार आहे.’

Web Title: Sangli Councilor Manoj Sargar Wins Youth Congress City District President

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top