सांगली जिल्हा एड्‌समुक्तीकडे ; चाचण्यांमधून बाधितांचे प्रमाण एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी

जयसिंग कुंभार
Friday, 4 December 2020

आजघडीला जिल्ह्यातील विविध एआरटी सेंटर्स व लिंक्‍ड एआरटी सेंटर्सकडे एआरटी औषधोपचार घेणाऱ्या एड्‌सबाधितांची संख्या 19 हजार 627 इतकी आहे.

सांगली : ज्या रोगाने नव्वदच्या दशकानंतर जगाला हादरून सोडले होते, त्या एड्‌सचा गेल्या दोन दशकांतील आलेख घटत चालला आहे. जिल्ह्यातील चाचण्या आणि बाधितांची संख्या एक टक्‍क्‍याच्याही खाली आली आहे. शासन यंत्रणांसह समाजसेवी संस्थांच्या व्यापक जनप्रबोधनातून ही कामगिरी साध्य झाली असून, शासनाकडून एड्‌सग्रस्तांसाठी दिल्या जाणाऱ्या एआरटी उपचारांमुळे एड्‌सबाधितांचे आयुष्यही आता दहा ते पंचवीस वर्षांनी वाढले आहे. 

आजघडीला जिल्ह्यातील विविध एआरटी सेंटर्स व लिंक्‍ड एआरटी सेंटर्सकडे एआरटी औषधोपचार घेणाऱ्या एड्‌सबाधितांची संख्या 19 हजार 627 इतकी आहे. त्यापैकी बहुतेक रुग्ण गेल्या दहा ते वीस वर्षांपासून औषधोपचार घेत आहेत. अगदी कोरोनाच्या आपत्तीतही या रुग्णांना घरपोच औषधे शासनयंत्रणेने पोहोचवली. 

सरासरी तीन ते पाच हजार रुपये किमतीची ही औषधे आज सर्व रुग्णांना मोफत दिली जातात. फारसा गाजावाजा न करता शासन यंत्रणा हे काम करीत आहे. एरवी शासन यंत्रणेच्या कामांबद्दल होणारी ओरड पाहता एड्‌समुक्तीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतलेले काम कौतुकास्पद असेच आहे. 

हेही वाचा -  शड्डू घुमला 15 वर्षांनी ; तरूणांच्या पुढाकाराने तालीम उभारली -

सुमारे वीस वर्षांपूर्वी चाचण्या आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या बाधितांचे प्रमाण 24 ते 34 टक्‍क्‍यांपर्यंत होते. आज ते चाचण्यांची संख्या सुमारे 38 पटीने अधिक वाढल्यानंतरही ते एक टक्‍क्‍याच्या खाली आले आहे. यावर्षी कोरोनाच्या टाळेबंदीने चाचण्यांची संख्या निम्म्याने कमी आहे. मात्र गतवर्षी हे प्रमाण 0.71 टक्के आणि यंदा 0.78 टक्के इतके आहे. 

आता एड्‌सबाधित माता-पित्यांनाही एड्‌समुक्त मूल जन्माला घालता येणे शक्‍य झाले आहे. आजघडीसी अशा एड्‌सबाधित 38 गर्भवती मातांना "एएनसी' उपचार दिले जातात. त्यांची मुले एड्‌समुक्त येण्याचे प्रमाण तब्बल 95 ते 98 टक्के इतके आहे. ज्यांचे आयुष्य अंधकारमय झाले आहे त्यांना आपली मुले मात्र निरोगी जन्माला घालण्याचा मिळालेला अधिकार आणि वरदान हे आधुनिक वैद्यक उपचार पद्धतीचे क्रांतिकारी यश आहे. 

शासन व समाज सेवी संस्थांच्या अथक प्रयत्नाने झालेल्या व्यापक जागृतीमुळे जिल्ह्याची वाटचाल एड्‌समुक्तीकडे सुरू आहे. एड्‌सचे समूळ उच्चाटन कधी होईल हे माहीत नाही. मात्र निरंतर समाजप्रबोधन हे सुरू ठेवलेच पाहिजे. विशेषतः युवापिढीसाठी यापुढेही काम करावे लागेल. 

- विवेक सावंत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (एड्‌स नियंत्रण) 

हेही वाचा - पोटचा मुलगा शहीद झाला ; तब्बल १२ वर्षे मातेची परवड -
 

जिल्ह्यातील एड्‌सची स्थिती 

वर्ष         * चाचण्या        * बाधित         * टक्केवारी 
2004        1808            448                24.78 
2005        2855             521               18.25 
2006        6499            2258             34.74 
2007      14793            3541             23.94 
2008       19983           3085             15.44 
2009       29257           3186             10.89 
2010       37320            3213              8.61 
2011        39460           2552              6.47 
2012         41922          2211             5.27 
2013         55801          1908            3.42 
2014         67759          1580            2.33 
2015         66981         1403             2.09 
2016         74337          1146           1.54 
2017         76764          1026           1.34 
2018         80304            831           1.03 
2019         114607          817            0.71 
2020           53769           417           0.78

 

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli district aids free inundated people percentage low only one