महाआघाडी, भाजपमध्ये चुरस: जिल्हा बँकेच्या चाव्यांसाठी कसरतच ; Sangli Bank Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

महाआघाडी, भाजपमध्ये चुरस: जिल्हा बँकेच्या चाव्यांसाठी कसरतच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का घटल्यामुळे उत्सुकता वाढली आहे. महाआघाडी विरूद्ध भाजपच्या पॅनेलमध्ये २१ पैकी १८ जागांवर निवडणूक झाली. बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी महाआघाडी (Maha Vikas Aghadi)व भाजपच्या (BJP) नेत्यांनी मतदान प्रक्रियेवर नजर ठेवली होती. काही केंद्रावर नेते दिवसभर ठाण मांडून होते. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता लागली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागील निवडणूक मे २०१५ मध्ये झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यमान संचालक मंडळाला दीड वर्षे जादा मिळाली. शेवटच्या कार्यकाळात काही संचालकांनी थकबाकीच्या मुद्द्यावरून संचालकातील दुफळी चव्हाट्यावर आली. अशातच बँकेची निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते, पालकमंत्री जयंत पाटील यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. परंतू जागा वाटपात तडजोड न झाल्यामुळे निवडणूक लागली. महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत लागली. अर्ज माघारीच्या दिवशीच महाआघाडतील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे खानापुरातून, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक शिराळ्यातून तर कॉंग्रेसचे महेंद्र लाड पलूसमधून बिनविरोध आले आहेत.

१८ जागांच्या निवडणुकीत सहकारचे १८ तर शेतकरी पॅनेलने १६ उमेदवार उभे केले होते. सोसायटी गटातील जत, आटपाडी, तासगाव येथे चुरस होती. तसेच बँका व पतसंस्था गट, मजूर गटातही चुरस होती. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, सेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार अजितराव घोरपडे आदींसह भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे यांनी जोरदार प्रचार केला. नऊ दिवस जोरदार प्रचार झाला. तालुकावार दौरे, वैयक्तिक भेटीगाठी, मोबाईल कॉलिंग, सोशल मिडिया आदींच्या वापराने प्रचारात चांगलाच रंग भरला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार का? याची उत्सुकता होती. नेते मंडळींनी निवडणुकीत गाफील राहू नका अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे उमेदवार दक्ष राहिले.

निवडणुकीत क्रॉस व्होटींगचा धोका असल्यामुळे सोसायटी गटातील उमेदवारांनी मतदारांवर करडी नजर ठेवली होती. काही मतदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्रितपणे सहलीला पाठवले होते. काल रात्री बरेच मतदार परतल्यानंतर आज त्यांना एकत्रितपणे मतदान केंद्रावर पाठवून सकाळच्या टप्प्यात त्यांचे मतदान पूर्ण करून घेण्यात आले. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात इतर मतदारांच्या प्रक्रियेवर उमेदवार लक्ष ठेवून होते. महाआघाडी व भाजपच्या नेत्यांनी काही मतदान केंद्रावर ठाण मांडले होते. तर काहींनी विविध केंद्रावर भेटी देऊन मतदानाची आकडेवारी घेतली. सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर मोकळा श्‍वास घेतला. आता बँकेतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याची उत्सुकता वाढली आहे. महाआघाडी किती जागा मिळणार आणि भाजप किती जागांवर मुसंडी मारणार? याकडे लक्ष लागले आहे.

सांगली केंद्रावर टक्का घटला...

बँकेची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर झाली. नेते व उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच मतदानाचा टक्का वाढणार असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात ८५ टक्के मतदान झाले. सांगलीत सर्वात कमी ५३.२१ टक्के मतदान झाले. त्यानंतर तासगाव, मिरजमध्ये ७८ व ७९ टक्के मतदान झाले. जतमध्ये ८५ टक्के मतदान झाले. उर्वरीत तालुक्यात मात्र चुरसीने ९० टक्केहून अधिक मतदान झाले.

कोणाला किती जागा?...

राष्ट्रवादीला ११, कॉंग्रेसला ७ आणि शिवसेनेला तीन जागा असा महाआघाडीचा फॉर्म्युला होता. तिघांची प्रत्येकी एक जागा निवडून आली आहे. उर्वरीत १८ पैकी किती जागा येणार? तसेच १६ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या भाजपला किती जागा मिळणार? याची उत्सुकता ताणली आहे.

loading image
go to top