सांगली : यंदा ड्रॅगन फ्रुटचे सातशे टनांवर बंपर उत्पादन

सांगलीची नवी ओळख
शेतकऱ्यांनो, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज करा! 40 टक्के अनुदान
शेतकऱ्यांनो, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अर्ज करा! 40 टक्के अनुदानGallery

सांगली : गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुट (गुंजाली) लागवडीखालील क्षेत्र वाढतच असून, गेल्या वर्षभरात तब्बल पाचशे एकरांवर नवी लागवड झाली आहे. यंदाचा हंगाम सुरू झाला असून, यावर्षी जिल्ह्यात सुमारे सातशे टन इतके फळ उत्पादन होण्याचा अंदाज आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत दरवर्षी दुपटीने उत्पादनात वाढ होत जाणार असून, नवनव्या बाजारपेठांमध्ये फळ पाठवण्यासाठी शेतकरी आणि बाजार समितीने सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

द्राक्ष, बेदाणा, बोर, डाळिंब, सीताफळ अशा फळ पिकांपाठोपाठ सांगली जिल्ह्याच्या पूर्वभागाची ड्रॅगन फ्रुटमुळेही देशभर नवी ओळख तयार होत आहे. जिल्ह्यात या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने नव्हे, तर येरळा प्रोजेक्ट सोसायटीच्या सारख्या स्वयंसेवी संस्थेने आणि ‘सकाळ’ सातत्याने निरंतर प्रयत्न केले आहे. ‘गुंजाली’ असे नामकरण करून हे फळ चिनी नव्हे तर भारतीय आहे, हे बिंबवण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणून महाराष्ट्र ड्रॅगन फ्रुट शेतकरी उत्पादक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

तडसर (ता. खानापूर) येथील आनंदराव पवार यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यभरातील उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीपासून निगराणीपर्यंतचे मार्गदर्शन करणारी व्यवस्था ‘येरळा’ने उभी केली आहे. या सर्व प्रयत्नांना चांगली फळे येत आहे. २०१५ अवघ्या दीड एकरात सुरू झालेले लागवड आता सुमारे आठशे एकरांवर पोहोचली आहे. यावर्षी तब्बल पाचशे एकरांवर नवी लागवड झाली असून, अधीचे सुमारे तीनशे एकर क्षेत्र जमेत धरता केवळ सांगली जिल्ह्यात सुमारे आठशे एकर या फळपिकाखालील क्षेत्र झाले आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर आणि आटपाडी या तालुक्यांमध्ये ही लागवड आहे. उटगी, जादरबोबलाद, निगडी, संख, मोरबगी, जालिहाळ, लवंगा, गिरगाव, विटा, तासगाव, बनपुरी, कामथ, खेराडवांगी, येतगाव, कडेगाव, रेणावी, वांगी या गावांमध्ये अनेक प्रयोगशील शेतकरी या पिकांकडे वळले आहेत.

गतवर्षी प्रथमच जिल्ह्यातून दुबई आणि इंग्लडला जिल्ह्यातून ड्रॅगनची निर्यात झाली. देशभरातील हैदराबाद, बंगळूर, दिल्ली, पुणे, मुंबई, कोईमतूर या शहरांमध्ये आता सांगलीच्या ड्रॅगनची विक्री सुरू झाली आहे. केवळ सांगली मार्केटमध्ये हंगामात रोज वीस टन फळ विक्री होत असते. गतवर्षी सरासरी ५० ते १८० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सरासरी दर गृहित धरला तरी गतवर्षी सुमारे आठ कोटी रुपये केवळ ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खिशात पडले आहेत. कमीत कमी उत्पादन खर्च आणि जोखीम आणि बाजारातील वाढती मागणी विचारात घेता येत्या काही वर्षांत दरवर्षी दुपटीने उत्पादन वाढणार असून, त्यासाठीचे बाजारपेठ व्यवस्थापन तातडीने करणे गरजेचे आहे.

सांगलीची नवी ओळख

पाचशे एकरांवर लागवड

दरवर्षी दुपटीने उत्पादनात वाढीचा अंदाज

विक्री व्यवस्थापनासाठी पुढाकाराची गरज

गुंजाली (ड्रॅगन) फळाच्या सांगलीच्या ब्रॅडिंगसाठी म्हणून बाजार समितीमार्फत विशेष प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आठवडाभरात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. संभाव्य बंपर उत्पादन विचारात घेऊन राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये माल पाठवण्यासाठी समिती आवश्‍यक ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना करेल.

- दिनकर पाटील, माजी सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

उत्पादक आणि व्यापारी यांच्यात थेट संपर्क यंत्रणा उभी करण्यासाठी www.drylanddragon.org नावाने संकेतस्थळ तयार केले आहे. इथे गेल्यावर उत्पादक शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होते. शिवाय प्रत्येक व्यापाऱ्यांच्या दुकानातच आम्ही क्युआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. त्यांना थेट सांगलीतून पाठवता येईल. एप्रिलमध्ये बाजारात व्हिएतनाममधून आयात ही फळे चवीला तुरट असतात. त्यामुळे ग्राहकांचा गैरसमज होऊ शकतो. त्यासाठी यावर्षीपासून ‘इंडियन ड्रॅगन’ अशी स्टीकर लावलेली फळे उपलब्ध करून देत आहोत. या प्रयत्नांना शासनाची मदत गरजेची आहे.

- एन. व्ही. देशपांडे, मुकुंद वेळापूरकर, विश्‍वस्त, येरळा प्रोजेक्ट सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com