
सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने यंदापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, या हेतूने तयार करण्यात आलेला हा आनंददायी अभ्यासक्रम राज्यातील मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमध्येही यंदापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे मोठे आव्हान आहे. विविध शिक्षण समित्या व आयोग यांनी शिक्षणातून शांतता, सौहार्द आणि सुसंवाद या मूल्यांच्या विकासावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर आनंददायी कृतींचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये सजगता, कथा, कृती, अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आला आहे. आनंददायी शिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून अध्ययनाविषयी त्यांची रुची वाढल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात पहिली ते आठवी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी ही आनंददायी कृती राबविल्यास त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी अभिरुची वाढीस लागेल. तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे अध्ययन अधिक सुकर होईल, अशी शासनाला आशा आहे.
शिक्षण ही सुलभ व आनंददायी प्रक्रिया असावी, यासाठी शासनाने मानवतावादी मूल्ये आणि सामाजिक आधार असलेला व वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेला आनंददायी अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर बनविला आहे. शाळेमध्ये वातावरण प्रसन्न असावे, विद्यार्थ्यांना शनिवारी, रविवारीही शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक दिवशी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेला आनंददायी कृती सर्वसाधारण ३५ मिनिटांच्या असतील. त्यासाठी प्रतितासिकेमधून ५ मिनिटांचा कालावधी कमी करून हा ३५ मिनिटांचा कालावधी उपलब्ध करून घेता येईल.
जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा
शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, आनंददायी अभ्यासक्रम राज्यभर पोहचणे हा सांगली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खेावला आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील निवडक शिक्षक व अधिकारी यांनी याचे लेखन केले. नववी व दहावीचा तसेच लिंगसमभाव व दिव्यांगांसाठी अभ्यासक्रम तयार केला. तो सन २०२२-२३ मध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देवून लवकरच राबवला देणार आहे. सजगता ९४, कथा ४२०, कृती १३३ व अभिव्यक्ती ८६ अशा लेखनाने हा अभ्यासक्रम तयार झाला. लेखनाची निवड रंगराव आठवले, दयासागर बन्ने, अमोल सातपूते, बाबासाहेब परीट, प्रसाद हसबनीस, गौतम कांबळे, भाग्यश्री चौगुले, भारती राजेशिर्के, महादेव माने, रघूवीर अथणीकर, श्वेता पाटील, अंजना निकम यांनी केली.
विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, त्यातून त्यांना जीवनकौशल्ये शिकता यावीत. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन ते आपल्या देशाचे आदर्श नागरिक बनावेत, असा या उपक्रमामागचा हेतू आहे.
- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
मूल्यमापन
या अभ्यासक्रमाचे कोणतेही मूल्यमापन केले जाणार नाही, विद्यार्थी किती आनंदी राहतो, आनंदाने, उत्साहाने अभ्यास करतो, आनंददायी कृतीमध्ये कसा सहभागी होतो, यावरून त्याचे अनौपचारिकरित्या मूल्यांकन केले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा प्रवास हा सर्वार्थाने वेगळा असतो, हे तत्त्व येथे विचारात घेतले जाणार आहे.
आनंददायी अभ्यासक्रमाचा उद्देश
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे
सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम बनविणे
विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ची जाणीव विकसित करणे
विद्यार्थ्यांना समस्या निराकरण करण्यास सक्षम बनविणे
विद्यार्थ्यांमधील शिकण्याविषयीची भीती, नैराश्य आदी दूर करणे
जबाबदारीबाबत जागरुकता निर्माण करणे
चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्वगुणांचा विकास होणे
आनंददायी अभ्यासक्रमाचे स्वरूप
विद्यार्थ्यांना आनंद समजणे व तो अनुभवणे, यासाठी सजगता, कथा (गोष्ट), कृती, अभिव्यक्ती यांचा समावेश केला आहे. प्रत्येक मंगळवारी शिक्षकांनी स्वतः मूल्ये, गाभाघटक, जीवनकौशल्ये, जबाबदारीचे भान याची जाणीव करून देणारी नाविन्यपूर्ण गोष्ट सांगून प्रश्न विचारावेत. बुधवारी त्याच गोष्टींची जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुनरावृत्ती करावी. प्रत्येक गुरुवारी, शुक्रवारी कृती किंवा अनुभवामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील, अशी कृती शिक्षकांनी लिहावी आणि विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावी. प्रत्येक शनिवारी शालेय परिपाठामध्ये अभिव्यक्तीसाठी काही उपक्रम घेता येतील. कृतज्ञता, स्नेह, ममता, सन्मान व्यक्त व्हावा, असे प्रश्न शिक्षकांनी विचारून विद्यार्थ्यांना बोलण्यास संधी द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.