सांगलीचे माजी महापाैर म्हणाले, अजित पवारांची स्वार्थासाठी गद्दारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा अतिशय वाईट दिवस आहे. या साऱ्या स्थितीचा विचार करून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि परत पक्षात फिरावे, असे आम्ही त्यांना आवाहन करतो.

सांगली - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वार्थी राजकारणासाठी पक्षासोबत आणि शरद पवार यांच्या सोबत गद्दारी केली आहे. पवारांवर प्रेम करणारा एकही माणूस अजित पवार यांना कदापि माफ करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी तोफ डागली आहे.

श्री. पाटील म्हणाले, "शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आज स्थापन होईल असे वाटत असताना अजित पवार यांनी स्वार्थी निर्णय घेतला. शरद पवार यांनी अतिशय कष्टाने, अतिशय चिकाटीने राज्यात 17 वरून 54 आमदार निवडून आणले. अनेकांनी चाळीस वर्षे सत्ता आणि मंत्रिपदी उपभोगले नंतर पवार यांना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा बिकट स्थितीत एका योध्द्या प्रमाणे पवार साहेब लढले आणि त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यात अजित पवार यांचा वाटा किती होता हे त्यांनाच माहिती आहे. अशा स्थितीत शिवसेना आणि काँग्रेस सोबत एक स्थिर सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली होती. शरद पवार यांनी एक महिना अतिशय नियोजनपूर्वक काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी केली होती. काल रात्रीच श्री. पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केले होते. असे असताना आज पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन भाजपसोबत जाणे हे लोकशाहीला काळीमा फासण्यासारखे आहे. शरद पवार यांचा राजकारणात एक करिष्मा आहे. त्यांना देशात प्रचंड मान आहे. त्या साऱ्याला अजित पवार यांच्या एका निर्णयाने मोठा धक्का पोहोचला आहे. पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा अतिशय वाईट दिवस आहे. या साऱ्या स्थितीचा विचार करून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि परत पक्षात फिरावे, असे आम्ही त्यांना आवाहन करतो."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Ex Mayor Suresh Patil Comment On Ajit Pawar