सांगली अखेर कॉलेज शिक्षणाचा प्रारंभ | Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर कॉलेज शिक्षणाचा प्रारंभ

सांगली : अखेर कॉलेज शिक्षणाचा प्रारंभ

सांगली : कोरोना संकट काळामुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेले उच्च शिक्षणाचे दरवाजे आज पुन्हा उघडले. जिल्ह्यात महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी हजेरी लावत पहिल्या दिवशी उत्साह दाखवला. प्राध्यापकांनी तातडीने पुस्तके उघडून अद्यापनाचा श्री गणेशा केला. काही वर्गांची प्रवेश प्रक्रिया अर्धवट आहे. ती आजपासून सुरु करण्यात आली.

राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी झाला. त्याचवेळी महाविद्यालये सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतू, थोड्या उशारीनेच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पदवीच्या सर्व शाखांचे वर्ग सुरु झाले. विद्यार्थ्यांनी दीर्घकाळाने वर्गात पाऊल टाकले. आता विद्यापीठाकडून पुढील सूचना येण्याची महाविद्यालयांना प्रतिक्षा आहे. कारण, कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून वर्ग भरले तरी एका वर्गासाठी पुरेसा वेळ असणार नाही. त्याबाबतचे नियोजन कसे केले जाणार, याची विद्यार्थी, प्राध्यापकांनी प्रतिक्षा राहणार आहे.

- तिसऱ्या वर्षाचे प्रवेश

पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे कला शाखेचे प्रवेश बाकी आहेत. आजपासून काही महाविद्यालयांनी ती प्रक्रिया सुरु केली आहे. आता अभ्यासक्रम किती घ्यायचा, परीक्षेचा पॅटर्न काय असेल, याबाबत विद्यापीठाकडून स्पष्टता होणे बाकी आहे.

हेही वाचा: बेळगाव : एपीएमसीत कांदा दर ४०० ने गडगडला

- बसेसचा प्रश्‍न

कोरोना लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील बस वाहतूकीची नियोजन कोलमडले आहे. प्रवासी संख्या कमी झाली आहे. या स्थितीत बसने प्रवास करून सांगली, मिरजेला कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटीने विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बसच्या फेऱ्या सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी कॉलेज प्रशासन आणि एसटी अधिकारी यांची बैठक गरजेची आहे.

‘‘एवढ्या दिवसानंतर कॉलेजला येताना आम्ही खूप आनंदी आहोत. अनेक मैत्रीणी व्हिडिओ कॉलवर भेटायच्या, पण प्रत्यक्ष भेटल्याने छान वाटतेय. आता अभ्यास, परीक्षेची चांगली तयारी करू.’’

- स्वरदा पाटील, विद्यार्थीनी

‘‘दीड वर्षांच्या दीर्घ खंडानंतर कॉलेज सुरु होणे आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे. विद्यापीठाने पुढचे नियोजन लवकर तयार केले तर त्यानुसार आम्हाला कार्यवाही करता येईल. पहिल्या दिवशी विद्यार्थी संख्या तुरळक होती, ती हळूहळू वाढेल.’’

- डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्राचार्य, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय

टॅग्स :Paschim maharashtra