पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या

पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या

सांगली - महापुरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 12 शाखा आणि एक एटीएम केंद्र पाण्यात बुडाले होते. यात सुमारे बॅंकेचे सुमारे 35 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर या बॅंकांमधील 65 लाखाची रोकडही पाण्यात बुडाली होती. परंतू पूर ओसरल्यानंतर या नोटा उन्हात ठेवून, ड्रायरने वाळवून तसेच चक्क इस्त्री करून पूर्ववत करण्यात बँकेला यश आले.
त्यानंतर या नोटा चलनातही वापरल्या गेल्या आहेत.

कृष्णा - वारणेला आलेल्या महापुरानंतर जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्‍यात हाहांकार उडाला होता. हजारो घरे, दुकाने पाण्याखाली गेली. अब्जावधीचे नुकसान झाले आहे. महापुराने अनेक गावांना वेढा दिल्यानंतर त्यामध्ये जिल्हा बॅंकेच्या 12 शाखाही पाण्यात बुडाल्या. 2005 चा अंदाज सर्वांनी बांधल्यामुळे अनेकजण गाफील राहिले. त्यामुळेच अनेकांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा बॅंकेच्या सांगलीतील महावीरनगर, गावभाग, ढवळी, मौजे डिग्रज शाखांमध्ये, वाळवा तालुक्‍यात तांबवे, जुनेखेड, वाळवा, रेठरेहरणाक्ष शाखांमध्ये, पलूस तालुक्‍यात दुधोंडी, बुर्ली, अंकलखोप शाखेत तसेच शिराळा तालुक्‍यात आरळा शाखेत पुराचे पाणी घुसले. तसेच भिलवडीतील एटीएम केंद्रही पाण्यात बुडाले. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बॅंकांच्या शाखातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे, इलेक्‍ट्रिक वायरिंग, कपाटे पाण्यात बुडाली. त्याचबरोबर काही शाखातील स्ट्रॉंग रूम, लॉकर्सही बुडाले. त्यामुळे आतील रोकड पुराच्या पाण्यात बुडाली.

पूर ओसरल्यानंतर जिल्हा बॅंकेच्या 12 शाखांपैकी सांगलीतील महावीरनगर आणि आरळा शाखेत प्रत्येकी 25 लाखाची रोकड तसेच इतर शाखातील मिळून 65 लाख रूपये पाण्यात भिजल्याचे निदर्शनास आले. बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी
यांनी तातडीने भिजलेल्या नोटांचे पुडके उन्हात वाळवण्यास ठेवले. विविध ठिकाणहून ड्रायर मागवून नोटा गरम केल्या. हे प्रयत्नही कमी पडले म्हणून की काय? कर्मचाऱ्यांनी विविध घरातून इलेक्‍ट्रिक इस्त्री मागवून त्यावर नोटा गरम करून पूर्ववत केल्या.

अथक प्रयत्नानंतर 65 लाखाची रोकड नष्ट होण्यापासून वाचवली गेली. तसेच बॅंकेच्या विविध शाखांमधून या पूर्ववत केलेल्या नोटा चलनात आणल्या गेल्या. नोटा पूर्ववत केल्यामुळे त्या वितरीत करताना कोणतीही अडचण आली नाही.

विमा कंपनीकडून सर्व्हे
जिल्हा बॅंकेच्या पाण्यात बुडालेल्या 12 शाखांचा विमा उतरवला आहे. बॅंकेच्या प्राथमिक तपासणीत 35 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विमा कंपनीकडून सर्व्हे सुरू आहे. तोपर्यंत या बॅंकांचे कामकाज तात्पुरते थांबवले आहे. दोन दिवसात कामकाज सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com