
सांगली: ‘वालचंद अभियांत्रिकी’चे मंगळवारी पदवीदान
सांगली: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दहावा पदवीदान समारंभ येत्या मंगळवारी (ता. १७) होणार आहे. २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ या दोन्ही शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येईल. कोरोना महामारीमुळे मागील वर्षी हा समारंभ न झाल्याने या दोन्ही वर्षांतील उत्तीर्णांचा एकत्रित असा हा कार्यक्रम होत आहे. यावेळचा हा समारंभ ऑनलाईन स्वरूपातील ‘ऑगमेंटेड रिॲलिटी’ या तंत्राद्वारे होणार आहे.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत. यावेळी सांगलीतून महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहातून प्रमुख ४८ यशवंतांचा सत्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के करतील. खासदार संजय पाटील, प्रशासकीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. एच. सावंत यांचेही यावेळी मार्गदर्शन होणार आहे. एकूण १३५५ विद्यार्थी पदवी घेतील. त्यांच्यासह जगभरातील ‘वॉलचंदियन्स’ हा कार्यक्रम पाहतील. यानिमित्ताने महाविद्यालयातील परीक्षा विभागातील अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते होईल.
डॉ. प्रशांत खरात व प्रा. अनिल सुर्वे या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक आहेत. हा कार्यक्रमासाठीची लिंक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (www.walchandsangli.ac.in ) उपलब्ध असेल. यंदाचे वर्ष महाविद्यालयाचे अमृतमहोत्सवी म्हणून साजरे होत असून, त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम होत आहेत.
Web Title: Sangli Graduation Walchand Engineering Tuesday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..