सांगली : मोकळ्या ‘औद्योगिक’ भूखंडांत होणार ‘ग्रीन स्पेस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sagli

सांगली : मोकळ्या ‘औद्योगिक’ भूखंडांत होणार ‘ग्रीन स्पेस’

सांगली : औद्योगिक वसाहतीत प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण वाढवावे लागणार आहे. उद्योग कार्यालयाने ‘ग्रीन स्पेस’साठी राखीव भूखंड तातडीने उपलब्ध करून द्यावेत. झाडांचे जतन करण्यासाठी पाण्याची उपलब्धता करून द्यावी. या वृक्षारोपण मोहिमेत औद्योगिक संघटनांनी सहभाग घ्यावा. उद्योगासाठी देण्यात आलेले भूखंड वापरात नसतील, त्यांच्यावर कोणत्याही कारखान्याची उभारणी केली नसेल, अशा मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण करून ते ताब्यात घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योगमित्र सभा श्री. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, व्यवस्थापक एन. एम. खांडेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु. आ. गांधीले, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची वाढ होत आहे. औद्योगिक क्षेत्र वसविण्यासाठी उद्योजकांकडून जागेची मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योग विभागाने जिल्ह्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी जागेची पाहणी करावी. स्थळनिश्चिती करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कुपवाड, मिरज औद्योगिक वसाहतीत ‘महावितरण’चे सबस्टेशन उभारण्यासाठी जागेची उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. सीईटीपी प्लांट तत्काळ सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी. औद्योगिक क्षेत्रांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने काम करावे.

कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालयासाठी भूखंड देण्याबाबत शासनास प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात जलवाहिनी, रस्त्यांचे पॅच वर्क तातडीने करण्यात यावेत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा.

मिरज एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनस सुरू करण्याबाबतही तपासणी करावी. त्याचप्रमाणे देशिंग औद्योगिक कार्यक्षेत्रात विद्युत पुरवठा नियमित करण्याबाबत ‘महावितरण’ने तातडीची बैठक आयोजित करून संबंधित उद्योग क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घ्यावेत व त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश दिले.

अतिक्रमणे हटवा

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी औद्योगिक वसाहत क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, ‘‘औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतिरोधक तातडीने तयार करावेत. ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत, अशा ठिकाणच्या टपऱ्या, खोकी काढावीत.’’

आरोग्यासाठी उपयोगी

कुपवाड, मिरज औद्योगिक वसाहतीत हवेतील धूर आणि धुळीचे प्रमाण चिंताजनक असल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आहे. सांगली, मिरज शहरांच्या तुलनेत तेथील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या ठिकाणी हिरवळ निर्माण केली तर धूर व धुळीच्या समस्येला काही प्रमाणात तोंड देता येणार आहे. एक मोठे झाड दररोज २३० लिटर ऑक्सिजन देत असते. या वातावरणातील ४८ पौंड कार्बन डायऑक्साईड आत घेत असते. प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी दररोज ५५० लिटर ऑक्सिजन लागतो. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत ‘ग्रीन स्पेस’ निर्माण करणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.

Web Title: Sangli Green Space Vacant Industrial Plots

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top