मुंबईपाठोपाठ सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक...प्रमाण 3.96 टक्के; चोवीस दिवसात 267 जणांचा मृत्यू 

शैलेश पेटकर
Wednesday, 26 August 2020

सांगली- मुंबईशहरातील मृत्यूदर 5.42 इतका आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. चोवीस दिवसात 267 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 3.96 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. दुसऱ्या बाजूला एकुण रुग्णसंख्येतील बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 61.12 टक्‍क्‍यांवर गेले आहे. 

सांगली- मुंबईशहरातील मृत्यूदर 5.42 इतका आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. चोवीस दिवसात 267 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 3.96 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. दुसऱ्या बाजूला एकुण रुग्णसंख्येतील बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 61.12 टक्‍क्‍यांवर गेले आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या चोवीस दिवसात झपाट्याने वाढ झाली आहे. 31 जुलै रोजी एकुण रुग्णसंख्या 2 हजार 643 इतकी होती. त्यावेळी त्यातील 78 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यावेळी मृत्यूदर 3.47 टक्के होता. गेल्या चोवीस दिवसांत 6 हजार 51 रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यूची संख्या 345 वर पोहचली आहे. सध्याचा मृत्यूदर चिंता वाढवणारा ठरत आहे. मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. चाळीसच्या आतील तरुणांचे मृत्यूही झाल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात उच्चांकी 25 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील रुग्णांची संख्या अधिक दिसून आली. सद्यस्थितीत चारशेहुन अधिक जणांची प्रकृतीचिंताजनक असून त्यातील 75 जण व्हेंन्टिलेटरवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 353 जण ऑक्‍सिजनवर आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून मिळालेली माहिती अशी, की मुंबई शहरात 137096 इतकी रुग्णसंख्या असून त्यापैकी 7442 रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर 5.42 इतका आहे. ठाणे विभागात मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरभाईंदर पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल हे भाग येतात. यासाऱ्याची रुग्णसंख्या 311066 इतकी आहे. त्यापैकी 12279 मृत्यू झाला. त्याची टक्केवारी 3.94 इतकी आहे. निशिक विभागात 80879 रुग्णसंख्या असून मृत्यू 2008 आहेत. त्याची टक्केवारी 2.48 आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या 152511 इतकी असून त्यापैकी 3765 जणांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू दर 2.46 टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर 2.65 टक्के इतका आहे. मुंबईपाठोपाठ सांगली जिल्ह्यात मृत्यूदर अधिक आहे. 

देशाचा मृत्यूदर 1.84 टक्के 
देशातील कालपर्यंतची रुग्णसंख्या 31 लाख 70 हजार झाली असून 58 हजार 390 जणांचा मृत्यू झाला. देशाचा मृत्यूदर 1.84 टक्के इतका आहे. परंतू सांगली जिल्ह्याता मृत्यूदर तिप्पट असल्याचे दिसून येत आहे. 75 टक्के रुग्ण देशात बरे झाले आहेत. 

रुग्णालये हाऊसफुल्ल 
गेल्या चोवीस दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या दिवसागणीक वाढत असून रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहे. उपचारासाठी खाटा मिळेना झाल्यात. त्यामुळे उपचाराविना रुग्णांचे हाल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका रुग्णालयाबाहेर वेळ उपचार न मिळाल्यामुळे तरूणाचा जीव गेला. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. 

आठवड्यात दोन हजारने रुग्णसंख्या 
या महिन्यात आठवड्यात रुग्णसंख्या दोन हजारांनी वाढत आहे. 1 ऑगस्टपर्यंत 2 हजार 643, 7 ऑगस्टपर्यंत 4 हजार 199, 15 ऑगस्टपर्यंत 6हजार159, तर 24 ऑगस्टपर्यंत 8 हजार 694 इतकी झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli has the highest mortality rate after Mumbai at 3.96 per cent; 267 deaths in twenty-four days