esakal | एकेकाळी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून आरोग्यसेवेसाठी झटणाऱ्या दवाखान्यांना आलीय अवकळा!

बोलून बातमी शोधा

एकेकाळी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून आरोग्यसेवेसाठी झटणाऱ्या दवाखान्यांना का आलीय अवकळा?
एकेकाळी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून आरोग्यसेवेसाठी झटणाऱ्या दवाखान्यांना का आलीय अवकळा?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: सांगली-मिरजेत डॉक्‍टरांची वानवा कधीच नव्हती. एक काळ होता की नगरपालिका आणि इथले डॉक्‍टर हातात घालून रुग्णसेवेसाठी कटिबद्ध होते. शहरात खासगीत प्रॅक्‍टीस करणारे बहुतेक डॉक्‍टर आठवड्यातले काही तास आवर्जून पालिकेच्या दवाखान्यात जाऊन मानसेवी सेवा द्यायचे. राजकारणीही आपले हेवेदावे बाजूला ठेवून आरोग्याकडे लक्ष देत होते, मात्र गेल्या तीस वर्षांत या साऱ्याच परंपरा लयाला गेल्या.

डॉ. राजेंद्र भागवत

डॉ. देवीकुमार देसाई पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. त्यांनी कॉंग्रेसच्या म्हणजे वसंतदादांचे उमेदवार राजाभाऊ जगदाळे यांचा पराभव केला. त्या राजाभाऊंच्या प्रभावक्षेत्रात खणभागात डॉक्‍टरांनी नगरपालिकेचे पहिले डायग्नोस्टीक सेंटर सुरू केले. त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री वसंतदादा आणि मिरजेचे डॉ. फ्लेचर यांच्या हस्ते झाले. तिथे सांगलीतील नामवंत धन्वंतरी एस. आर. पाटील, धनपाल आरवाडे, आप्पासाहेब चोपडे, विश्‍वास कुलकर्णी, रवींद्र व्होरा अशी मंडळी आवर्जून मानसेवी तत्त्वावर सेवा द्यायचे. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून ही सारी मंडळी आरोग्यसेवेसाठी झटत होती. नगरपालिकेच्या प्रसूती केंद्रात तेव्हा डॉ. वाटवे आणि पुढे मंगल राजपूत यांनी इतके काम केले, की सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा जास्त प्रसूतींची संख्या तिथे असायची. मुस्लिम, मागासवर्गीय, वंचित कष्टकरी वर्गातील महिलांसाठीच नव्हे तर सर्व स्तरांतील कुटुंबांतील महिला इथे यायच्या. त्यांच्याशी या डॉक्‍टरांचा असेलला लळा मी अनुभवला आहे. हे सारे लयाला कसे गेले...?

साधारण 1990 पर्यंत सारे काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर नगरपालिकेत डॉक्‍टरांची खोगीरभरती सुरू झाली. आपल्या वशिल्याच्या अपात्र लोकांची भरती इथे सुरू झाली आणि प्रामाणिकपणे सेवा देऊ इच्छिणारे शहरातील डॉक्‍टर नगरपालिकेच्या दवाखान्यांपासून दुरावत गेले. गेल्या तीस वर्षांत पालिकेचा आरोग्य विभाग म्हणजे नातलगांची वर्णी आणि आरोग्यबाह्य खर्चावर उधळपट्टी असा प्रकार झाला. त्याचवेळी सांगली-मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल्समुळे पर्यायी व्यवस्थाही होत गेली. दुसरीकडे नंतरच्या पिढीतील डॉक्‍टरांमधील सेवाभावही कमी झाला. लोकांप्रती उत्तरदायित्वाची वैद्यकीय क्षेत्राची कमी झालेली भावनाही पालिका दवाखान्यांच्या अवकळेला जबाबदार आहे.

महापालिकेने सर्व नागरिकांना किमान प्राथमिक स्वरूपाच्या वैद्यकीय सेवा द्यायची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी केवळ इस्पितळे उभी करून चालणार नाहीत, तर तिथे पात्र स्टाफ दिला पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतूद वाढवली पाहिजे. आता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद घुमत आहे. खरेतर असे वाद रुग्ण हिताला बाधा आणणारे आहेत. इस्पितळ कोठे याला महत्त्व नाही तर तिथे सुविधा काय देणार हे महत्त्वाचे. हे हॉस्पिटल राज्य सरकारची यंत्रणा चालवेल म्हणून महापालिका डोळे मिटून बसू शकत नाही.

मुंबईसारखी महापालिका चार मेडिकल कॉलेजची हॉस्पिटल चालवते. कोल्हापूर-साताऱ्याच्या पालिकेचे दवाखानेही आपल्यापेक्षा चांगले आहेत. पालिकेच्या प्रमुख मंडळींनी खरे आपण मल्टिस्पेशालिटी चालवणार म्हणजे काय करणार याचा अंतर्मुखपणे विचार करावा. सांगली-मिरजेतील सर्व डॉक्‍टरांचा सहभाग घेऊन हे मल्टिस्पेशिलिटी राज्य शासन, महापालिका आणि इथल्या सर्व डॉक्‍टरांचे व्हावे. ते यशस्वीपणे चालवण्याचा सर्वांनी निर्धार करावा. त्यासाठी प्रामाणिक इच्छाशक्ती दाखवावी.