सांगली : राज्यातील पतसंस्थांतील ठेवीना लवकरच विमा संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

सांगली : राज्यातील पतसंस्थांतील ठेवीना लवकरच विमा संरक्षण

सांगली: नागरी सहकारी बॅंकाप्रमाणे राज्यातील पतसंस्थांतील ठेवीना विमा संरक्षण देण्याचा लवकरच निर्णय घेवू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली. ते म्हणाले, राष्ट्रीयकृत बॅंकाच्या कर्जदारांना दिल्लीपासून गल्लीपर्यत एकच नियम पाहिजे. बड्या भांडवलदारांना एक रक्कमी कर्जमाफीत ५० टक्के सवलत आणि सामान्य कर्जदारांकडून जप्तीची कारवाईचा भेदभाव कशासाठी असा प्रश्‍न उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित केला.

सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रशस्त मुख्यालयाचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शहर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेच्या वास्तुविशारद प्रकाश जाधव व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याहस्ते उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह सर्वाचा सत्कार मानपत्र देवून करण्यात आला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नागरी सहकारी बॅंकांतील पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. त्याच धर्तीवर राज्यातील पतसंस्थातील ठेवीना विमा संरक्षण देण्यासाठी तातडीने निर्णय घेवू. त्यासाठी लवरकच सहकार मंत्री, राज्यमंत्र्यासह सर्व सबंधित यंत्रणाची बैठक घेवून विषय मार्गी लावला जाईल. विश्‍वासाने ठेवलेले पैसे बुडाले नाही पाहिजेत. कर्जवसुलीही महत्वाची आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांतून बडे भांडवलदार कर्जे काढतात. थकवतात आणि एक रकमी परतफेडीतून ५० टक्के माफी घेतात आणि सर्वसामान्य कर्जदारांची जप्ती होते. त्यात बदल झालाच पाहिजे. अन्यथा ही मोठे आव्हान ठरु शकते.‘

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सांगलीतच नव्हे तर राज्याच्या वैभवात भर टाकणारी कर्मवीर ही पहिली पतसंस्था मी पाहतोय. धकाधकीच्या काळात संस्था चालवणे सोपे नाही. भुदरगड पतसंस्थेसह जळगावातील पतसंस्थाची अवस्था वाईट झाली आहे. पतसंस्थांचे संचालक कोण यावर ठेवी जमतात. कर्मवीरमध्ये डॉक्टर, वकील, व्यवसायिकांकडे बघून ठेवी जमल्यात. ७०-७५ वर्षातील लोकांनी अनेक उन्हाळे-पावसाळे झेललेत. त्यांचे अनुभव संस्था चालवताना होतो. कोरोनाच्या काळातील अडचणींवर मात करुन संस्था उभारत आहेत. कर्मवीरमध्ये ठेवी ६५८ कोटी, कर्जे ४८७ कोटी व निव्वळ ८ कोटीचा नफा आहे.

संस्थेच्या मापदंडात नफा चांगला आहे. यंदा लाभांषही १८ टक्के दिला. ठेव ठेवणारा, कर्ज घेणारे सभासद आहेत. ४६ हजार सभासद आणि संस्थेची निवडणूक बिनविरोध हे कौतुकास्पदच आहे. पण भविष्यात इमारत पाहून निवडणुकीत गर्दीची शक्यता आहे. ती टाळावी. जुन्या बरोबर तरुणांनाही पतसंस्थेचे संचालक म्हणून कारभार शिकवा, त्यांना संधी द्या, पुढे त्यांचा चांगला उपयोग होईल. कर्मवीरांच्या नावप्रमाणेच शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम सुरु आहे. राज्यात २ लाख सहकारी संस्थांमध्ये हा आदर्श आहे. सहकारातील नवी आव्हाने पेलायला हवीत. त्यासाठी आताही सर्वानाच प्रशिक्षणाची गरज आहे. मला वाटते संस्थचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर आहे. ते राज्यभर करुन घ्यावे, त्यासाठी मदत करु. राज्यात महाविकास आघाडी जात. पात, धर्म, पक्ष न पाहता निर्णय घेतो. तातडीने प्रस्ताव द्या, निर्णय घेवू.‘

सहकार राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, गेल्या काही वर्षात पतसंस्थापुढे अडचणी होत्या. मात्र यातून कष्टातून ज्या टिकल्या त्यांना सध्या चांगले दिवस आलेत. त्यात कर्मवीरचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ कार्पोरेट लूकमध्ये कर्मवीरची इमारत दिमाखात उभी आहे. उपमुख्यमंत्री पवार यांना अपेक्षीत असणारी स्वच्छता, टापटीप आहे.

संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना म्हणाले, छोट्याश्‍या खोलीतून विश्‍वासार्हता व पारदर्शी कारभारामुळे संस्थेचा वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आजमितीस १३ कोटीची अद्ययावर इमारत, ५१ शाखा, त्यातील २५ स्ववास्तु, आणि नव्याने १० शाखा सुरु करीत आहोत. २० कोटीचा नफा आहे. नेहमीचा लाभांष १३ टक्के, यंदा अधिक ५ टक्के जादा देत आहोत. हे सर्वांनी घेतलेल्या कष्टामुळे शक्य झाल्याचे सांगितले.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा भारती चोपडे, ॲड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, लालासाहेब थोटे, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, ललिता सकळे, आप्पासो गवळी, बजरंग माळी, महेश संत, डॉ. एस. बी. पाटील, गुळाप्पा शिरगिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli Insurance Protection Deposits Credit Unions State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top