सांगली-इस्लामपूर राज्य महामार्ग उध्वस्त; शेकडो खड्डे ; अपघातांची मालिका

महादेव अहिर
Wednesday, 21 October 2020

सांगली जिल्ह्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा सांगली - इस्लामपूर राज्य महामार्ग अक्षरशः उध्वस्त झाला आहे. शेकडो मोठे खड्डे पडले आहेत.

वाळवा (जि. सांगली ) ः जिल्ह्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा सांगली - इस्लामपूर राज्य महामार्ग अक्षरशः उध्वस्त झाला आहे. शेकडो मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मुळात जमीनीचा विचार न करता महामार्गाची झालेली डागडुजी याला कारणीभूत मानली जात आहे. या मार्गाने मोठीच काय पण दोनचाकी वाहने चालवतानाही जीव मुठीत धरून जावे लागते. 

सांगली - इस्लामपूर राज्य महामार्ग पश्‍चिमेला आशियाई आंतरराष्ट्रीय महामार्गाला मिळतो. राज्याच्या विविध भागातुन जिल्ह्यात येणारी वाहतूक याच मार्गाने होते. रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते. वैद्यकीय उपचारांच्यादृष्टीने सांगली-मिरजेला महत्त्व मोठे आहे. सांगली-इस्लामपूर राज्य महामार्गावर गंभीर अतिगंभीर रूग्णांची ने-आण 24 तास सुरू असते. औद्योगिक, शेती उत्पादनांच्या वाहतूकीसाठी महामार्ग महत्वपूर्ण आहे. 

पेठनाक्‍यापासून सांगलीपर्यंत महामार्ग काळ्याजमिनीतूनच जातो. इथे कित्येक फुटावर धर नाही. सातत्याने पाऊस, अवजड वाहतूकीने महामार्ग खचतो. आष्टा ते सांगलीपर्यंत चौपदरीकरण झाले आहे. कोणतेही काम जमीनीचा दर्जा आणि होणारी वाहतूक गृहीत धरून झाले नाही. तुंग - कसबेडिग्रज दरम्यान तर काही महिन्यांपूर्वी नव्याने खडीकरण डांबरीकरण झाले. हाही रस्ता खचला आहे. पावसाचीही गरज नाही. इतके काम दर्जेदार झाले. 

पंधरवड्यांत मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाने महामार्गाची चाळण झाली. अगदी फुटांपासून काही मिटर लांबी रूंदीचे खड्डे पडलेत. काही ठिकाणी तर पावसाच्या पाण्याचा या रस्त्यावर ठिय्याच असतो. तो का ? हे बांधकाम विभागाच्या लक्षात न येत नाही हे अनाकलनीय आहे. 

मोठ्या खड्डयांमुळे रस्ता मृत्यूमार्ग ठरत आहे. रोज लहानमोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्यावर बारा महिने दुरूस्तीचे काम सुरू असते. खड्ड्यांमुळे प्रवासालाही वेळ लागतो. वाहनधारकांना अकारण भुर्दंड बसतो. महामार्गावरील कामांचे ऑडीट होण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे कोट्यावधीचा खर्च होत आहे. रस्त्याची दुर्दशा काही थांबताना दिसत नाही. रस्त्याने रोज प्रवास करणारे लोक तर अक्षरशः वैतागलेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli-Islampur state highway destroyed; Hundreds of pits; A series of accidents