सांगली : ‘जलसंपदा’च्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून कृती आराखडा तयार

शामरावनगरातील पाण्याचा २० लाखांत निचरा शक्य
 ‘जलसंपदा
‘जलसंपदाsakal

सांगली : भूतलावर नरकयातना अनुभवयाच्या असतील तर पावसाळ्यात शामरावनगर परिसरात एकदा फेरफटका माराच. वर्षानुवर्षे सुमारे ३५ हजार लोकसंख्येचा हा परिसर सांडपाणी आणि पाऊस-महापुराच्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्यांनी त्रस्त आहे. पाण्याच्या निचऱ्याअभावी या भागात रोगराईचा कायमचा वेढा पडलेला असतो. यातून सुटका करणारा परिपूर्ण आराखडाच जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. महिन्याभरापूर्वी या संपूर्ण परिसराचा तज्ज्ञांमार्फत सर्व्हे करून तत्काळ करता येईल, अशा उपाययोजना त्यांनी सुचवली असून त्यासाठी अवघे वीस लाख रुपये हवे आहेत.

गेल्या दोन महापुराने अवघ्या शहरालाच वेठीस धरल्यानंतर त्यातून सुटका कशी करायची यासाठी महापूर नियंत्रण कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने दोन महिन्यांपूर्वी ‘स्पंदन’ संस्थेच्या मदतीने सांगली बंधाऱ्यापासून शामरावनगर परिसराचा ड्रोन

सर्व्हे केला.

आयर्विन पुलाच्या किमान ४३ फूट पाणी पातळीपर्यंतचा पूर या भागात शिरणार नाही, तसेच या भागातील साचणाऱ्या सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा तत्काळ कसा निचरा करता येईल यासाठी अभ्यास केला आहे. समितीने स्पंदन ग्रुपच्या मदतीने याचा शास्त्रशुद्ध अहवाल तयार करून तो महापालिकेला आणि शासनास सादर केला आहे.

तत्काळ उपाययोजना

सांगली हरिपूर रस्‍तावरील लोखंडी पुलाजवळील ओढ्यापासून सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील उदय हॉटेलपर्यंत नैसर्गिक ओढ्याचे कमी अधिक प्रमाणात अस्तित्व आहे. हा ओढा उदय हॉटेलपासून (पूर्वी इथे सशाचे तळे होते) खिलारे मंगल कार्यालय, एपीजे अब्दुल कलाम हायस्कूल, धामणी हद्दीतून हा रस्ता पुढे अंकलीजवळ सध्याच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाखालून कृष्णा नदीला मिळतो. सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा ओढा रिकामा करण्याशिवाय पर्याय नाही. उदय हॉटेलजवळ शिरलेले पाणी पुन्हा पश्‍चिमेकडे कृष्णा नदीकडे येत नाही. ते वरील मार्गे पुन्हा अंकलीकडे जाते हे लक्षात घेतले पाहिजे. फक्त ४० फूट उंचीचा महापूर आला तरी पाणी उदय हॉटेलपर्यंत येते. त्यामुळे या ओढ्याची खोदाई करून तो वाहता करावा लागेल.

खोदाईच्या कामाची व्याप्ती

साधारण २.४० मीटर तळाकडील बाजूस, ४ मीटर जमीन पातळीवर आणि २ मीटर उंचीने या ओढ्याची खोदाई करावी लागेल. त्यातून १४० क्युसेक पाण्याचा प्रवाह वाहू शकेल. साधारणतः १० हजार चौरस मीटर खोदकाम असेल. जवळपास ३० हजार ब्रास गाळ बाहेर पडेल. यांत्रिक वाहनांद्वारे खोदकामासाठी सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे १८ ते २० लाख रुपये इतका खर्च येईल.

दोनच कुटुंबांचे स्थलांतर

ओढ्याच्या तीन किलोमीटरच्या अंतरात फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे नाहीत. ओढ्यालगतची कुटुंबे स्थलांतरीत न करताही हे काम होऊ शकेल. फक्त दोनच घरे पूर्णपणे नाल्यावर आहेत. या कुटुंबांच्या स्थलांतराची जबाबदारी महापलिकेला घ्यावी लागेल. एवढ्यावरच जवळपास ३५ हजार लोकसंख्येला दिलासा मिळू शकतो. या परिसराचा एकूण तीन प्रभागांशी संबंध येतो आणि १२ नगरसेवक या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. या संपूर्ण परिसरात दरवर्षी मुरुम आणि रस्तेकामांसाठी काही कोटींचा खर्च होत असतो. हा सारा पैसा पाण्यात जातो.

दुरगामी उपाययोजना

सांगली शहरात महापुराचे पाणी पूरपातळी पन्नास फुटांनंतर घुसते. शामरावनगरात मात्र ४२ फुटांनंतरच ते शिरते. ते पाणी हरिपूर रस्त्यावरील लोखंडी पूल नाल्यातून घुसते. सध्या या नाल्यातूनच शहराचे सांडपाणी कृष्णा नदीवरील बंधाऱ्याखालील पात्रात सोडले जाते जे पुढे हरिपूरला जाऊन मिळते. हरिपूरपर्यंतच्या उताराचा अभ्यास करून या नाल्याच्या नदीजवळील मुखाजवळ धरणासारखे गेट केले तर किमान पन्नास फुटांपर्यंत शामरावनगर परिसरात महापुराचे पाणी येणार नाही, अशी व्यवस्था करता येणे शक्य आहे.

‘शामरावनगरातून जाणाऱ्या तीन किलोमीटर अंतराच्या ओढ्याच्या खोदाईसाठी सुमारे २० लाख रुपये खर्च येईल. एकदा का पाणी निचऱ्याची समस्या सुटली की या ओढ्याला शामरावनगरातील सर्व ड्रेनेज लाईन्स जोडून या भागातील सांडपाण्याची समस्याही कायमस्वरुपी सोडवता येईल. महापालिकेचे सध्याचे प्रयत्न दिशाहीन असून त्यांनी किंवा क्रिडाईसारख्या संस्थांनी पुढे येऊन हा निधी उभा करून दिल्यास आम्ही यासाठी पूर्णवेळ विनाअपेक्षा काम करून हा प्रश्‍न सोडवू शकतो. या परिसरातील नगरसेवक व नागरिकांनीही पुढे येऊन लोकसहभागाचा आदर्श उभा करुयात!’

- विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार

सेवानिवृत्त अधिकारी, जलसंपदा विभाग

सर्वेक्षणाचा निष्कर्ष

तत्काळ व दीर्घ उपाययोजनांचा आराखडा तयार

उदय हॉटेल ते अंकली दरम्यानचा तीन किलोमीटर नैसर्गिक ओढा खोदाईची तातडीची गरज

कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ नाल्याच्या मुखाजवळ धरणांप्रमाणे प्रवेशद्वाराचाही उपाययोजनेत समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com