Sangli : जतला पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा; पालकमंत्री सुरेश खाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

Sangli : जतला पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा; पालकमंत्री सुरेश खाडे

जत : ‘‘काम करणारा कोण आणि काम न करणारा कोण, याचा अनुभव जनतेला आला आहेच. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहा. गेल्या वेळी चूक झाली, ती यंदा दुरुस्त करा. आगामी काळात तालुक्यात पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा,’’ असा टोला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचे नाव न घेता लगावला.

जत तालुक्यातील अंकले येथे विविध विकासकामांचे उद्‍घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होतो. माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस उपाधीक्षक रत्नाकर नवले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, शंकर वगरे, आकाराम मासाळ, संग्राम जगताप, सरपंच संगीता चंदनशिवे, उपसरपंच विलास नाईक, राजू चौगुले आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, ‘‘कामगारांना विमा देण्यासाठी जिल्ह्यात ईएसआयसी हॉस्पिटल उभे करू. शिवाय, पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलासाठी दीड-दोन लाख मिळतात. कामगार खात्याकडून आणखी दोन लाख मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. त्यांना हक्काचे घर मिळवून देऊ. कामगार आयुष्यात सुखी झाला पाहिजे. यासाठी पाठपुरावा करू.’’

माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘‘गेल्या अडीच ते तीन वर्षांत जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे झाली. केवळ मोठे आकडे सांगून एवढा निधी आणला, याचा गाजावाजा जास्त झाला. मात्र, प्रत्यक्षात जनतेला काहीच मिळालेले नाही. आम्ही मंजूर केलेली कामेही तेही त्यांना सुरू करता आलेली नाहीत. आज शेवटी भाजपच्याच पालकमंत्र्यांनी याचा प्रारंभ केला. त्यामुळे जतच्या जनतेला भाजपच न्याय देऊ शकतो.’’

‘जतचा विकास करणार’

प्रथम जतच्या जनतेने मला निवडून दिले. यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनी महत्त्वाची साथ दिली. आज पक्षाचा आमदार होत, मंत्रिपदाची संधी दिली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजपने राज्यात काम करायची संधी दिली. त्यामुळे जतचा विकास साधायचा असेल तर भाजपच एकमेव पक्ष जनतेला न्याय देईल, असेही पालकमंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.