सांगली : राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचे जयंत पाटलांचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

सांगली : राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचे जयंत पाटलांचे प्रयत्न

सांगली : काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष याचा फायदा उठवत जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे राष्ट्रवादीचे लक्ष्य असेल, मात्र ते तितकेसे सोपेही नाही. राष्ट्रवादीला संधी असली तरी जयंत पाटील ती कशी साध्य करतात याकडे लक्ष असेल.

जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आर. आर. पाटील, मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व आले. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात चार आमदार, खासदार, जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात असतानाही भाजपला आपले नेतृत्व विकसित करता आले नाही. तर काँग्रेसमध्ये नेतृत्वाची अचानक पोकळी निर्माण झाल्याने तेथेही नवीन नेतृत्व तयार होऊ शकले नाही. याचा फायदा उठवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

राष्ट्रवादीसमोरही आव्हाने

गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीला फटका बसला होता. राष्ट्रवादीचे १५ जागी सदस्य विजयी झाले होते. त्यातील दहा सदस्य हे वाळवा आणि तासगाव तालुक्यातील होते. हे दोन्ही तालुके राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत, मात्र मिरज, जत, खानापूर आणि आटपाडी या चार तालुक्यांत राष्ट्रवादीची पाटी कोरी होती. आजमितीसही या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला झगडावे लागत आहे.

फोडाफोडीचा फायदा कितपत?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचा प्रसार करण्याकडे लक्ष दिले आहे. यामध्ये त्यांनी विटाचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक हे दोन प्रमुख नेते राष्ट्रवादीत घेण्यात यश मिळवले. मात्र, जत, आटपाडी, कवठेमंकाळ या तालुक्यातील नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. यातील विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचा जिल्हा परिषदेसाठी फारसा फायदा होईल, असे दिसत नाही; परंतु शिराळ्यात शिवाजीराव नाईक यांच्यामुळे राष्ट्रवादीला बळ मिळू शकेल.काँग्रेस, भाजपअंतर्गत

वादाचा फायदा

काँग्रेस आणि भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादी उठवू शकते. काँग्रेसमध्ये नेतृत्वातच सुंदोपसुंदी आहे, तर भाजप नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस आहे. याचा फायदा उठवत जयंत पाटील यांनी महापालिकेत सत्ता ताब्यात घेतली तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतही राष्ट्रवादीची ताकद वाढवली. त्यामुळे त्यांचे पुढचे लक्ष्य अर्थातच जिल्हा परिषद राहणार हे उघड आहे.

तालुकानिहाय जि. प. सदस्य

वाळवा ६, तासगाव ४, कवठेमहांकाळ २, शिराळा २, पलूस १.

Web Title: Sangli Jayant Patil Increase The Strength Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top