सांगलीत कृष्णाकाठी महापुराची धास्ती, पाणीपातळी 34 फुटांवर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

सोमवारी (ता. 17) दुपारी साडेबारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 34 फुटांवर गेली. ती रात्री उशीरापर्यंत 40 फुटांवर पोहचेल, असा प्राथमिक अंदाज आहे. कृष्णाकाठच्या भागातील घरांतून तातडीने स्थलांतर करण्याची सूचना महापालिकेने केली असून नागरिकांनी साहित्य बांधायला सुरवात केली आहे. 

सांगली ः सन 2019 ला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाप्रलयकारी महापूर आला होता. यंदा तो काळ मागे सरला आणि कृष्णाकाठी हायसे झाले.

यंदा महापूर येणार नाही, अशी आशा निर्माण झाली, मात्र पुन्हा सांगलीकरांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढायला लागली आहे. सोमवारी (ता. 17) दुपारी साडेबारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 34 फुटांवर गेली. ती रात्री उशीरापर्यंत 40 फुटांवर पोहचेल, असा प्राथमिक अंदाज आहे. कृष्णाकाठच्या भागातील घरांतून तातडीने स्थलांतर करण्याची सूचना महापालिकेने केली असून नागरिकांनी साहित्य बांधायला सुरवात केली आहे. 

कोयना धरणातून काल रात्रीपासून 55 हजार क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तो काल दुपारी 34 हजारांच्या घरात होता. पुढील पाच दिवस कोयना पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सहाजिकच धरणात पाणीसाठा वाढणार आहे.

सोबतच कृष्णा नदीच्या क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने नदीत वेगवेगळ्या मार्गातून येणारे पाणी वाढत निघाले आहे. त्याचा वेग रविवारी सायंकाळनंतर वाढला आहे. त्यामुळे सावंत प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली, रामनगर, श्‍यामरावनगर या भागातील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. पाणी पातळी 45 फुटांवर गेल्यास हे भाग पाण्याखाली जातात. त्याआधी काही भागांत पाणी शिरते. आता कर्नाळ रस्त्यावरील पूल शेरीनाल्याच्या पाण्याखाली गेला आहे. सावंत प्लॉटमधील काही पत्र्याचे शेडवजा घरे पाण्यात गेली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Krishnakathi, water level at 34 feet