
सांगलीत कमी आवाजात अजान; मनसेचे मारुती मंदिरात हनुमान चालिसा
सांगली - मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यभर वाद पेटलेला असताना आज सांगलीत पहाटेची अजान भोंग्यावरून देण्यात आली नाही. दुपारी सव्वा एकची अजान अत्यंक मी आवाजात दिली गेली. प्रत्येक मशिदीबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेने मारुती चौकातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना सावध आहेत. भोंग्याचा वाद जातील सलोख्याला बाधा आणणारा ठरू नये, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु होते. आज सकाळपासून नेमके काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पहाटे साडेपाच वाजताची अजान भोंग्यावरून देण्यात आली नाही. मुस्लिम समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदीच्या आदेशाचे पालन केले. त्यामुळे कोणताही वाद उद्भवला नाही.
शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशीदसह शहरातील मदीना मशीद, गरीब नवाज मशीद, जामा मशीद, गवळी गल्लीतील मक्का मशीद, कत्तलखाना परिसरात नुरानी मशीद, संजयनगर येथे अक्सा मशीद येथे हळू आवाजात दुपारची अजान झाली. विश्रामबागला वालचंद कॉलेजच्या बाजूला एक मशीद आहे, मात्र तेथे भोंगे नाहीत. तेथे मुस्लिम समाजाची वस्तीच नसल्याने भोंगे नसल्याचे सांगण्यात आले.
मुस्लिम समाजातील तरुण, मशीदचे विश्वस्त यांनी दुपारी एकत्र येत कोणत्याही स्थितीत कुणाशीही वाद घालायचा नाही, शांतता राखायची, अशी भूमिका घेतली. पाकिजा मशीदचे विश्वस्त निहाल अन्सारी म्हणाले, ‘‘न्यायालय आणि सरकार जो काही आदेश देईल तो आम्हाला शंभर टक्के मान्य आहे. आम्हाला नमाज जितके प्रिय आहे, तितकेच संविधान प्रिय आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन आम्ही करणार नाही. उद्या सांगितले लाऊडस्पीकर पूर्ण बंद करा, तर आम्ही त्या आदेशाचे पालन करू.
दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, संदीप टेंगले आदींनी मारुती चौकातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठणे केले. त्यांना पोलिसांनी काल नोटीस बजावली होती. त्यांनीही कायद्याचा सन्मान करत शांततेने आपली प्रतिक्रिया देत हनुमान चालिसाचे पठण केले.
Web Title: Sangli Loudspeaker Controversy Hanuman Chalisa Mns Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..