सांगली महापौर, उपमहापौरांनी राजीनामे द्यावेत... कुणाचे आदेश?

Sangli Mayor, Deputy Mayor told to resign
Sangli Mayor, Deputy Mayor told to resign

सांगली : महापौर संगीता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना सोमवारच्या (ता. 20) महासभेत राजीनामा देण्याचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज फोनवरून दिले. या पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षापेक्षा जास्त संधी मिळाली. त्यामुळे सोमवारच्या सभेत महापौर राजीनामा देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

दीड वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली. त्यानंतर पहिली अडीच वर्षे महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण होते. त्यामुळे मिरजेच्या संगीता खोत यांना पहिल्या महापौर होण्याचा मान दिला; तर धीरज सूर्यवंशी यांना उपमहापौरपदी संधी दिली. दोघांना सव्वा वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसेच ऑगस्टमध्ये आलेला महापूर यामुळे महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ मिळाली. 

नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेत दगाफटका होईल, या शंकेने बदल लांबणीवर पडला. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता राखल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महापालिकेत पूर्ण बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापौर संगीता खोत व उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांना राजीनामा देण्याचे आदेश शनिवारी दिले आहेत. 

महापौरांना दूरध्वनी करून चंद्रकांत पाटील यांनी सोमवारच्या महासभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले. महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी द्यावा, अशी विनंती केली. मात्र, ती फेटाळून लावली. पक्षातील इतरांनाही पदे मिळाली पाहिजेत. तसा शब्द सदस्यांना दिला आहे. तुम्हाला दीड वर्षे संधी दिली आहे. त्यामुळे सोमवारी राजीनामा द्यावा, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महापौरांना सांगितले. त्यामुळे महापौर व उपमहापौर सोमवारी होणाऱ्या सभेत राजीनामा देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

महापौरपदासाठी गीता सुतार व सविता मदने 
महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण फेब्रुवारी 2021 पर्यंत आहे. मिरजेला महापौरपदाचा पहिला मान मिळाल्यामुळे आता सांगलीला महापौरपदाची संधी मिळणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून गीता सुतार व सविता मदने यांची नावे चर्चेत आहेत. कुपवाडच्या कल्पना कोळेकरही इच्छुक आहेत. महापौरांनी राजीनामा दिल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली गतिमान होणार आहेत. 

गटनेत्यांचाही राजीनामा? 
महापौर व उपमहापौर यांच्या राजीनाम्यानंतर नूतन महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर गटनेते युवराज बावडेकर यांचाही राजीनामा घेण्यात येणार आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com