फायर ऑडिटमध्ये सांगली, मिरज सिव्हिल "फेल' 

बलराज पवार
Wednesday, 20 January 2021

सांगली जिल्ह्यातील दोन महत्त्वाची रुग्णालये असलेली सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल फायर ऑडिटमध्ये "फेल' ठरली आहेत.

सांगली : जिल्ह्यातील दोन महत्त्वाची रुग्णालये असलेली सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल फायर ऑडिटमध्ये "फेल' ठरली आहेत. अग्निशमन उपकरणे वगळता आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी कोणत्याही सुविधा या दोन्ही हॉस्पिटलमध्ये नसल्याचे फायर ऑडिटमध्ये समोर आले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे महापालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगितले.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात सांगली आणि मिरज सिव्हिल रुग्णालयाचे फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन्ही रुग्णालयांची तपासणी केली. तेथील आग प्रतिबंधक सुविधा आणि आगीसारख्या दुर्घटनेवेळी आवश्‍यक यंत्रणा आहे का? याची तपासणी करण्यात आली. 

भंडारा जिल्हा रुग्णालयात लहान मुलांच्या आयसीयु विभागात झालेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने सर्व शासकीय, खासगी हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले होते. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी टीमकडून दोन्ही हॉस्पिटलचे फायर ऑडिट पूर्ण केले आहे. 

मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे म्हणाले,""दोन्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अग्निशमन उपकरणे आहेत. मात्र आगप्रतिबंधक व जीव संरक्षक कायदा 2006 नुसार जे निकष शासनाने घालून दिले आहेत, त्यातील कोणत्याही सुविधा या ठिकाणी नाहीत. सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एकूण 18 इमारती आहेत. या सर्व इमारतींची पाहणी करण्यात आली. या फायर ऑडिटचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.'' 

ते म्हणाले,""जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचेही फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यात येईल. पलूस, चिंचणी वांगी, कडेगाव, विटा, भिवघाट, आटपाडी, तासगाव, आष्टा, इस्लामपूर, शिराळा, कोकरूड, कवठेमहांकाळ, जत, माडग्याळ, बेळंकी येथील हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट महापालिका अग्निशमन विभाग करणार आहे.'' 

कर्मचाऱ्यांना 26 जानेवारीनंतर प्रशिक्षण देण्याचा विचार
सांगली आणि मिरज सिव्हिलमध्ये अग्निशमन उपकरणे म्हणजे सिलिंडर वगळता इतर सुविधा नाहीत. तेथे फायर हायड्रंट सिस्टीम, फायर अलार्म, स्मोक डिटेक्‍टर नाहीत. तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आहेत, मात्र तेथे फायर एक्‍झिटचे फलक नाहीत. लिफ्ट असल्या तरी दुर्घटनेवेळी वापरावयाची लिफ्ट नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले नाही. सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना 26 जानेवारीनंतर प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. 

- चिंतामणी कांबळे, अग्निशमन अधिकारी, सां-मि-कु मनपा.  

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli, Miraj civil hospital "fail" in fire audit