सांगली महापालिका स्थायी सभापती निवडीचा पेच

बलराज पवार
Sunday, 20 September 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश असताना आता स्थायी समिती सभापती निवडीचा पेच उभा राहिला आहे.

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश असताना आता स्थायी समिती सभापती निवडीचा पेच उभा राहिला आहे. या निवडीत मतदान प्रक्रिया असल्याने ऑनलाईन सभेत प्रक्रिया कशी राबवायची याबाबत प्रशासनाने नगरसचिव, विभागीय आयुक्तांकडे अभिप्राय घेण्याचे ठरवले आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आठ नवीन सदस्यांचा समावेश झाला आहे. त्यांची निवड काल (शुक्रवारी) ऑनलाईन महासभेत जाहीर करण्यात आली. स्थायी समितीच्या 16 सदस्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे नऊ तर विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सात सदस्य आहेत. सभापती पदासाठी सांगलीचे सविता मदने, कुपवाडचे गजानन मगदूम आणि मिरजेतून पांडुरंग कोरे यांची नावे चर्चेत आहेत. त्यांनी नेत्यांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

पुढच्या वर्षी महापौर निवड असल्याने त्याचा प्रभाव या निवडीवर राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कुणाच्या गळ्यात स्थायी समिती सभापतीची माळ पडणार याची चर्चा रंगली आहे. सध्या तरी यामध्ये कुपवाडला की सांगलीला संधी याकडे लक्ष आहे. मिरजेचे संदीप आवटी हे विद्यमान सभापती होते. तर महापौरपद सांगलीच्या गीता सुतार यांच्याकडे आहे. शिवाय पहिल्या वर्षी महापौरपद मिरजेला तर स्थायी सभापतीपद सांगलीवाडीकडे होते. दोन वर्षाच्या कारभारात कुपवाडच्या पदरात काहीच पडलेले नाही. यामुळे कुपवाडचे सदस्य स्थायीसाठी आग्रही आहेत. भाजपमध्ये काही बिनसले तर आपली डाळ शिजवण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे भाजपच्या हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. 

स्थायी समिती सभापती निवड मतदानाने घ्यावी लागणार आहे. मात्र ऑनलाईन सभा घेण्याच्या सुचनेनुसार अर्ज भरण्यापासून मतदाना पर्यंतची प्रक्रिया कशी राबवायची, असा प्रश्न आहे. याबाबत कायदेशीर अडचण नको यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशाने प्रकिया करणार आहे. 

संपादक : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Municipal Corporation sthai samiti Chairman selection problem