
सांगली महापालिकेची महासभा थेट सभागृहात घ्यावी, या मागणीला नगरविकास खात्याकडून अद्याप कोणताच निर्णय न आल्याने उद्याची (ता. 17) महासभा ऑनलाईनच होणार हे निश्चित झाले आहे.
सांगली : महापालिकेची महासभा थेट सभागृहात घ्यावी, या मागणीला नगरविकास खात्याकडून अद्याप कोणताच निर्णय न आल्याने उद्याची (ता. 17) महासभा ऑनलाईनच होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महासभा ऑनलाईनच घेण्याच्या हट्टाबाबत उद्या सदस्य प्रशासनाला जाब विचारणार का? हा सवाल आहे. या सभेत वादग्रस्त विषय मंजुरीसाठी आणले आहेत. त्यावर चर्चा होणार की बिनबोभाट मंजूर होणार याकडे लक्ष आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महासभा थेट सभागृहात व्हावी अशी सर्वच सदस्यांची मागणी आहे. तरीही प्रशासनाने कोरोनाचे कारण दाखवत महासभा ऑनलाईन घेण्याची नोटीस काढली आहे. ही महासभा उद्या (ता. 17) होत आहे.
यामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी 14 व्या वित्त आयोगातून 11 कोटी 40 लाख 788 रुपयांची सुमारे 25 वाहने खरेदी करण्याचा विषय आहे. तर मिरज रोडवरील एका खासगी हॉस्पिटलला 21 गुंठे जागा नाममात्र भाड्याने देण्याचा विषयही आणला आहे. या विषयांवरुन वादळी चर्चा अपेक्षित आहे.
शिवाय कुपवाडमधील शाळा आणि क्रीडांगणाचे आरक्षण उठवण्यास जोरदार विरोध होत आहे. तोही विषय सभागृहाच्या मान्यतेस ठेवला आहे. मिरजेत महापालिकेच्या मालकीचा सि.स.क्र. 1027 अ मध्ये असलेला 21 गुंठ्यांचा खुला भूखंड सिनर्जी हॉस्पिटलला ऑक्सिजन प्रकल्पासाठी भाडेपट्टयाने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.
मुळात हा प्रकल्प सप्टेंबरमध्येच उभारण्यात आला आहे. त्याला आधी तीन महिन्यांसाठी नंतर 11 महिन्यांसाठी भाड्याने देण्याची मागणी केली आहे. तो केवळ दोन लाख 23 हजार रुपयांना देण्यावरुन वाद होणार आहे.
आरक्षण उठवण्याचा घाट...
कुपवाडमधील सर्व्हे. क्र. 194/1 मधील आरक्षण क्र. 333 ची जागा प्राथमिक शाळा आणि आरक्षण क्र. 338 ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. या भागात गुंठेवारीतून निवासी घरे झाल्याचे कारण पुढे करत आरक्षण उठवण्याचा घाट घातला आहे. त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
संपादन : युवराज यादव