आघाडीचं ठरंना; भाजपचं जुळंना! सांगली महापौरपदाचा पेच

Sangli Municipal Corporation's mayoral post politics is still not solved
Sangli Municipal Corporation's mayoral post politics is still not solved

सांगली : महापालिकेच्या महापौरपदाचा पेच आजही कायम राहिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेची संधी दिसत असताना त्यांच्यात महापौरपदाच्या उमेदवारीचा घोळ मिटलेला नाही. भाजपला अद्याप नॉटरिचेबल सदस्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे आघाडीचं ठरंना, अन्‌ भाजपचं जुळंना अशी एकूण स्थिती आहे. 

महापौर, उपमहापौर निवडीसाठी आता अवघा एक दिवस बाकी आहे. मंगळवारी (ता. 23) ऑनलाईन विशेष सभा होणार आहे. यामध्ये महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. अर्ज दाखल करून तीन दिवस उलटले तरी सत्तांतर होणार, की सत्ता राहणार याचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. भाजपचे नऊ सदस्य बुधवारपासून नॉट रिचेबल आहेत. त्यातील दोघे काल (शनिवारी) परतले; तर आणखी एकजण संपर्काबाहेर गेला. या सगळ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न भाजप नेते कसून करत आहेत. या सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. प्रसार माध्यमातून जाहिरातीद्वारेही व्हीप प्रसिद्ध केला आहे. भाजपचे सध्या सुमारे 27 सदस्य गोव्यात आहेत. त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतही महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी महापौरपदासाठी दावा केला आहे. राष्ट्रवादीचे पारडे महापौरपदासाठी जड मानले जात असतानाच कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरपदाची उमेदवारी उत्तम साखळकर यांना मिळावी, अशी मागणी नेत्यांकडे केली. कॉंग्रेस नेत्यांनीही महापौरपदाची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तांतराची शक्‍यता वाटत असताना, आता कॉंग्रेस आघाडीतच सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. शिवाय अजून आघाडीच्या नेत्यांचीही याबाबत गांभीर्याने चर्चा झालेली नाही. त्यामुळे आघाडीतच महापौरपदाचा पेच निर्माण झाल्याचे दिसते. 

फॉर्म्युला नसल्याने चलबिचल 
आघाडीच्या नेत्यांना महापालिकेत सत्तांतर होण्याची शक्‍यता वाटत असली, तरी अद्याप त्यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला कसा असेल, हे स्पष्ट नसल्यानेही नगरसेवक चलबिचल आहेत. सत्तांतर झालेच तर महापौर, उपमहापौर यांच्यासह स्थायीमध्ये काय होणार? सभागृह नेतेपद याबाबतचा फॉर्म्युला ठरवावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. त्यावर नेत्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. 

आघाडीचे नगरसेवक सहलीवर 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सध्या सहलीवर आहेत. त्यांचे नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. शनिवारी कॉंग्रेसचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल होते. आज यामध्ये आणखी काही नगरसेवकांची भर पडली. राष्ट्रवादीचेही नगरसेवक शहराबाहेर आहेत. हे सर्व नगरसेवक कोकण सहलीवर असल्याचे समजते. 

महापौर आमचाच होणार

आमचे सगळे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांशीही संपर्क सुरू आहे. त्यामुळे महापौर निवडीत अडचण येणार नाही. आमच्याकडे बहुमत असल्याने महापौर आमचाच होणार हे स्पष्ट आहे. 
- शेखर इनामदार, भाजप नेते 

महापौरपदाच्या उमेदवारीची मागणी करणार

महापौरपदासाठी आम्ही आग्रही आहोत. आमच्या नगरसेवकांची मागणी रास्त आहे. आम्ही सर्वजण मिळून जो निर्णय घेऊ त्याला सर्व नगरसेवक एकमुखाने पाठिंबा देतील. मात्र आम्ही राष्ट्रवादीकडे महापौरपदाच्या उमेदवारीची मागणी करणार आहे. 
- विशाल पाटील, नेते, कॉंग्रेस 

ऑनलाईन निवडीचे धोके 
महापौर, उपमहापौर निवडीसाठी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे सभागृहात उपस्थित न राहता कुठूनही मतदान करता येणार असल्याने यामध्ये अनेक धोके येऊ शकतात अशी चर्चा आहे. नगरसेवकांना धमकावून मतदान करता येऊ शकते किंवा त्यांना गैरहजर ठेवता येऊ शकते; अशा शंकाही व्यक्त केल्या जात आहेत. नॉट रिचेबल नगसेवकांबाबतीत मतदानादिवशी त्यांच्याबाबतीत हे प्रकार घडू शकतील, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

संपादन :  युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com