द्राक्षबागांना शेडनेट, प्लास्टिक आच्छादनास 50 टक्के अनुदान देण्यास सरकार सकारात्मक - सहकारमंत्री

प्रताप मेटकरी
शुक्रवार, 9 मार्च 2018

विटा - द्राक्षबागाना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनसाठी 50 टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

विटा - द्राक्षबागाना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनसाठी 50 टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित लक्षवेधीच्या चर्चेत आमदार अनिल बाबर यांनी द्राक्षबागायातदारांचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी द्राक्षबागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात आमदार बाबर यांच्यासमवेत द्राक्षबागायतदार महासंघाची एका महिन्याच्या आत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी निर्णय घेऊ असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या अधिवेशनात द्राक्षबागायतदारांच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित झाला होता. प्रारंभी सहकारमंत्री देशमुख यांनी द्राक्षाची निर्यात वाढल्याचे सांगताच आमदार अनिल बाबर यांनी यांनी चर्चेत भाग घेत द्राक्षबागायतदारांच्या समोरील समस्या व त्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले.       

आमदार अनिल बाबर म्हणाले, "द्राक्ष निर्यात वाढलेली आहे हे गृहीत धरले तर जसे साखर व्यवसायात उत्पादन जास्त होते. म्हणून आपण निर्यातीच्या दृष्टीने काही सवलतीही दिल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने फळबागांच्याही उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. देशाच्या बाजारपेठेलाही मर्यादा आहेत. शेतकरी जर ऊसाच्या शेतीपासून फळबागाकडे वळू लागला असेल आणि वाढलेले उत्पादन बाहेर पाठवायचे असेल तर तशा प्रस्तावित योजना शासनाकडून करण्यात आल्या पाहिजेत. फळबागा हे भांडवली पीक आहे. त्यासाठी भांडवली खर्चही मोठा करावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनेही काही योजना करणे आवश्यक आहे. अलिकडच्या काळात द्राक्षबागावर शेडनेट आणि प्लास्टिक आच्छादनाचे काही यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. त्यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येईल काय ? असा सवालही आमदार बाबर यांनी उपस्थित केला.

त्यावर बोलताना सहकारमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, द्राक्षबागायतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून द्राक्षबागाना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनसाठी 50 टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.

द्राक्षबागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात आमदार बाबर यांच्या समवेत द्राक्षबागायतदार महासंघाची एका महिन्याच्या आत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Sangli News 50 percent subsidy for Grape shednet