करा गटशेती अन्‌... मिळवा एक कोटी

विष्णू मोहिते
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

लोकसंख्यावाढीमुळे शेतीचे तुकडे होत चाललेत. शेतकऱ्यांवर मजूर बनण्याची वेळ आली. सरासरी प्रत्येक शेतकऱ्याकडे आता २०-३० गुंठे शेतीही उरली नाही. परिणामी शेती परवडत नाही. ती पडीक ठेवणेही योग्य वाटत नाही. म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेती उत्पादनाला मिळणारा भाव हा त्यानंतरचा विषय. शासनाने गट किंवा समूह शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षांसाठी एक योजना जाहीर केली आहे. १० सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत होती. त्याअंतर्गत आतापर्यंत १५ प्रस्ताव दाखल झालेत. ही आकडेवारी गटशेती, शेतकऱ्यांसाठी आशादायक आहे...

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देऊन सबलीकरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतलाय. पथदर्शी योजनेची सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन्ही वित्तीय वर्षांत अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली. राज्यात २०० गटांचे उद्दिष्ट असले तरी सांगली जिल्ह्यात सहा किंवा सात गट पात्र ठरू शकतात. जिल्ह्यातून जत ४, मिरज ५, तासगाव, वाळवा प्रत्येकी २, विटा व कडेगाव प्रत्येकी एक प्रस्ताव आलेत. 

सहकारी संस्था अधिनियम १९६० अथवा कंपनी नोंदणी अधिनियम १९५६ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्‍यक आहे. दोन वर्षांत योजनेंतर्गत प्रत्येक गटास जास्तीत जास्त एक कोटीचे अनुदान मिळणार आहे. प्रतिवर्षी राज्यात २०० शेतकरी गटांना पात्र ठरवले जाईल. जिल्ह्यातील सहा किंवा सात गट पात्र ठरतील. गट निवडताना पीक पद्धती व शेतीचा प्रकार विचारात घेतला  जाणार आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व  मत्स्यव्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांच्या आदर्श नमुना प्रकल्पांचा त्यात समावेश असेल.

योजनेत शेती अवजारे, अर्थसहाय्य देण्याचीही सोय  आहे. गटातील सदस्यांची संख्या वाढण्यासह या  सदस्यांचे एकूण क्षेत्र १०० एकरच्या पटीत वाढवले जाईल. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व पुरस्कारास पात्र ठरलेल्या शेतकरी गटांना प्रथम (२५ लाख), द्वितीय  (१५ लाख), तृतीय (५ लाख) याप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील. 

एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणनासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण  करणे, या सर्व माध्यमांतून गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गट अथवा समूह शेती.

जमिनीचे तुकडे
लोकसंख्यावाढीमुळे शेतीचे विभाजन कायम आहे. धारण क्षमताही दिवसेंदिवस कमी होत आहे. २०१०-११ च्या अहवालानुसार महाराष्ट्रात १९७०-७१ मध्ये असलेली ४.२८. हेक्‍टरची धारण क्षमता कमी होत जाऊन ती २०१०-११- मध्ये १.४४ हेक्‍टर प्रतीखातेदार इतकी कमी झाली. काही ठिकाणी तर ती ११ ते १५ गुंठे इतकी कमी आहे. एवढ्या छोट्या क्षेत्रावर शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही, असे अभ्यासात आढळले आहे. या समस्येवर समूह शेती प्रभावी उपाय ठरू शकतो. 

उत्पादन वाढीचे उद्दिष्ट...
समूह शेतीमुळे उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर होण्यास मदत होणार आहे. सामूहिकरीत्या शेतीमालाची विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढणार आहे. काही शेतमालांवर काढणी पश्‍चात प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळणे शक्‍य होऊ शकेल. समूह शेतीतून मोठ्या प्रमाणावर भांडवल व उत्पादन निर्माण होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्‍य होईल.

सामूहिक शेतीमुळे पशुपालन, रेशीम व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रोपवाटिका, मधुमक्षिका पालन आदी शेतीपूरक जोडधंदे करणे शक्‍य होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.

कागदोपत्री गट वाढले
गटशेती यशस्वी करायची तर शेतकऱ्यांत आदर्श गटशेतीसाठी प्रबोधनाची गरज आहे. राज्यातील शेतकरी गटांचे मूल्यांकन झाले. फक्त कोगदोपत्री शेतकरी गट वाढले. अनुदानासाठी कागदोपत्री स्थापन झालेल्या गटांना चाप बसवण्यात आला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गटांना प्रोत्साहन द्यावे. यातील अपप्रवृत्तींना आळा घातला तरच तरच गटशेतीचे आदर्श मॉडेल  उदयास येईल.

Web Title: sangli news agriculture