खुजगाव धरणामुळे दुष्काळ हटला असता - अजितराव घोरपडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

इस्लामपूर - लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या भूमिकेप्रमाणे जर खुजगावला धरण झाले असते तर जे कृष्णा खोऱ्याचे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या  तीन राज्यांमध्ये पाणी वाटप झाले. त्यामध्ये आपल्या राज्याच्या वाट्यास जादा पाणी येऊन मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग ओलिताखाली आला असता, असे मत माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी मांडले.

इस्लामपूर - लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या भूमिकेप्रमाणे जर खुजगावला धरण झाले असते तर जे कृष्णा खोऱ्याचे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या  तीन राज्यांमध्ये पाणी वाटप झाले. त्यामध्ये आपल्या राज्याच्या वाट्यास जादा पाणी येऊन मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग ओलिताखाली आला असता, असे मत माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी मांडले.

राजारामबापू साखर साखर कारखान्याच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘माझ्या आठवणीतील बापू’ या विषयावर आयोजित  व्याख्यानात ते बोलत होते. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी आमदार विश्वासराव पाटील, लालासाहेब यादव, ॲड. बाबासाहेब मुळीक, सभापती सचिन हुलवान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. घोरपडे म्हणाले, ‘‘कृष्णा खोऱ्याच्या पाणी  वाटपासाठी नेमलेल्या लवादाकडे आपण जादा पाण्याची मागणी केली 
असता, त्यांनी तुमच्याकडे तुम्ही मागता, तितके पाणी साठविण्यासाठी भांडी (जागा) कुठे आहे? असा प्रतिवाद केला. दुष्काळी भागास पाणी द्यायचे  असेल तर पाण्याचे साठे वाढवायला हवेत, अशी बापूंची भूमिका होती. मात्र, दुर्दैवाने तसे घडलेले नाही. सध्या आमच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्‍यात पाणी आले. त्यातून आमच्या दोन तालुक्‍यांची वार्षिक उलाढाल ५ हजार कोटींच्यावर गेलीय. खुजगाव येथे धरण झाले असते तर कवठेमहांकाळसह जत, आटपाडी, खानापूर आदी दुष्काळी तालुके ओलिताखाली येऊन जिल्ह्याच्या विकासाला प्रचंड गती मिळाली असती. रोजगार उपलब्ध झाला असता. बापूंची राहणी साधी होती. पांढऱ्या रंगाचे धोतर, शर्ट व टोपी असा त्यांचा पोशाख होता. त्यांचे  एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देऊन स्वावलंबी बनविले.’’

पाणी पाहायला बापू हवे होते...
घोरपडे म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या राजकारणावर नजर फिरवा, बापूंनी ज्यांच्या ज्यांच्या डोक्‍यावर हात ठेवला ते-ते आमदार झाले. माझ्या जरा जादा ठेवल्याने मी मंत्री  झालो. प्रत्येक कामात बारकावे व काटेकोर अंमलबजावणी हा त्यांचा स्वभाव होता. जिव्हाळा व आपुलकीने जिल्ह्यात, राज्यात एक परिवार निर्माण केला. मला जे-जे मिळाले ते-ते बापूंच्या प्रेरणा व आशीर्वादाने मिळाले. माझ्या भागात आलेले पाणी पाहण्यास बापू हयात हवे होते.’’

अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले,‘‘स्व. बापूंनी वाळवा तालुक्‍याचा सर्वांगीण विकासाबरोबर राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान केले आहे. बापूंचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे स्वभाव, कार्य, कामाची पद्धत ही नव्या पिढीला समजायला हवे.’’ या व्याखानास प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, डॉ. प्रताप पाटील, राजाराम पाटील, हणमंतराव देसाई, दिनकरराव पाटील, विष्णुपंत शिंदे, भीमराव पाटील, बी. डी. पवार, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, डॉ. एन. टी. घट्टे, भरत देशमुख, सुजित मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Sangli News Ajitrao Ghorpade comment