बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

बोरगाव (ता. वाळवा) येथील बापू बिरु वाटेगावकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. इस्लामपूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपाचाराअंती आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

इस्लामपूर - बोरगाव (ता. वाळवा) येथील बापू बिरु वाटेगावकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. इस्लामपूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपाचाराअंती आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निमोनियाच्या आजाराने ते त्रस्त होते. उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात त्यांना ठेवण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता त्यांच्या मुळगावी बोरगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

1925 च्या दरम्यान जन्मलेल्या बापू बिरु वाटेगावकर यांनी गावात त्रास देणाऱ्या गाव गुंडाचा खून केला. तेव्हा पासून त्यांच्या गुन्हेगारी प्रवासास सुरुवात झाली. त्यांच्यावर खूनाचे अनेक गुन्हे दाखल झाले. 25 वर्षाहून अधिक काळ ते फरार होते. 1985 च्या दरम्यान फरारी अवस्थेत ते बोरगाव परिसरात आले असता पोलिसांनी 26 मार्च 1989 साली त्यांना अटक केली. नंतर कळबा कारागृहात त्यांना ठेवले होते. सांगली येथे न्यायालयीन सुनावणीसाठी येत असताना 1993 ला पोलिसांच्या तावडीतून पळून गेले. त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयीन शिक्षा संपल्यानंतर त्यांना 2002 साली त्यांना कारागृहातून मुक्‍ती मिळाली. तेथून पुढे ते भजन, किर्तन करण्यात व्यस्थ होते. वयाची 90 वर्षे पार केलेले बापू बिरु वाटेगावकर यांची तब्बेत चांगली होती.

मागील वर्षी त्यांच्या गुडघ्यावर शास्त्रक्रिया केली होती. तब्बेतीच्या किरकोळ कारणामुळे त्यांना पाच दिवसापूर्वी येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज सव्वादहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे शितगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी 9 वाजता त्यांच्या मुळ गावी बोरगाव येथे शिवाजीनगर परिसर भागात त्यांच्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. नंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर कृष्णा काठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Sangli News Bapu Bhiru Vategaonkar no more