कलाकृतींनी इतिहास विकृत होऊ नये - डॉ. जयसिंगराव पवार

प्रताप मेटकरी
सोमवार, 29 जानेवारी 2018

प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. परंतु ते करत असताना दुसऱ्याचंही स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. तुमच्या कलाकृतींनी इतिहास विकृत होता कामा नये, तो सुसंस्कृत झाला पाहिजे, हे इतिहासकार, संशोधक, कलाकारांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी विटा येथे केले.

विटा -  पद्मावत चित्रपटावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. आज तुम्ही चितोडच्या राणीविषयी लिहलं, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीतरी कराल, पण एक खपलं म्हणून दुसरं खपवून घेणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. परंतु ते करत असताना दुसऱ्याचंही स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. तुमच्या कलाकृतींनी इतिहास विकृत होता कामा नये, तो सुसंस्कृत झाला पाहिजे, हे इतिहासकार, संशोधक, कलाकारांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी विटा येथे केले.

येथील साहित्य सेवा मंडळ, भारतमाता ज्ञानपीठ आणि राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयातर्फे आयोजित ३६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ॲड. सदाशिव पाटील, साहित्य सेवा मंडळाचे संस्थापक रघुराज मेटकरी, स्वागताध्यक्ष ॲड. मोहनराव कदम, कविसंमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर उपस्थित होती.

 

डॉ. पवार म्हणाले,‘‘प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. परंतु असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही मानायला तयार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोण जर इतिहासाचे विकृतीकरण करणार असेल तर त्यांना आम्ही प्राणपणानं विरोध करू. अलीकडच्या काळात इतिहासाच्या संकल्पना बदलल्या आहेत. इतिहास हा साहित्यात प्रतिबिंबित होतो. साहित्याच्या आधारानेच इतिहास लिहिला जातो. भाषा हा संस्कृतीचा आत्मा असतो. भाषा गुलाम बनते तेव्हा संस्कृतीही गुलाम बनते. ऐतिहासिक साहित्यिकाला नाट्यमयतेचे आकर्षण असते. शिवाजी महाराजांच्यावर १२-१३ नाटकं झाली. तर संभाजीमहाराजांवर तब्बल २०० नाटके झाली. इतिहास घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम साहित्यिक करतात, हे संभाजी या मालिकेने करून दाखविले आहे. परंतु संभाजीराजेंचे चरित्र वाचले जात नाही.

साहित्यिक पांढऱ्यावर काळे करतो, असा समाजात गैरसमज आहे. सहज सुचलं म्हणून लिहलं असं होऊ नये. लेखन करताना चिंतन आणि जबाबदारीची जाणीव असावी. साहित्यिकांनी प्रसिद्धीच्या मागे लागू नये. दाद मिळो अथवा न मिळो जे जगतो ते साहित्यात आणले पाहिजे. तरच कवींच्याबद्दल निर्माण झालेल्या गैरसमजाला छेद मिळेल.

- डॉ. अविनाश सांगोलेकर

या वेळी डॉ. ऋषिकेश मेटकरी, योगेश मेटकरी, वैशाली कोळेकर, प्राचार्य डॉ. प्रकाश मोकाशी, अरुण लंगोटे, अँड. सुभाष पाटील, सुभाष पवार, विष्णुपंत मंडले, प्रदीप दिवटे, अमोल हत्तरर्गीकर, प्रा. विश्वनाथ गायकवाड, प्रा. अंकुश निकम, संपतराव पवार यांच्यासह नागरिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. आभार योगेश मेटकरी यांनी मानले.

Web Title: Sangli News Dr Jayshingrao Pawar Comment