सावधान... वीज कोसळतेय! 

योगेश घोडके
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सांगली  - गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात वीज कोसळून तीन लोकांचा मृत्य झाला. शहरातील एका उंच इमारतीवर वीज कोसळल्याने भगदाड पडले. या घटनांनी लोकांमध्ये घबराट आहे. वीज चमकू लागल्यानंतर नेमके काय करावे, याविषयी लोक अनभिज्ञ आहेत. वीज ही उंच इमारत, ठिकाण, झाड आणि धातूकडे आकर्षित होते. त्यामुळे वीज चमकत असताना उंचीवर जाणे टाळावे, अशी सूचना तज्ज्ञांनी "सकाळ'च्या माध्यमातून केली आहे. 

सांगली  - गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात वीज कोसळून तीन लोकांचा मृत्य झाला. शहरातील एका उंच इमारतीवर वीज कोसळल्याने भगदाड पडले. या घटनांनी लोकांमध्ये घबराट आहे. वीज चमकू लागल्यानंतर नेमके काय करावे, याविषयी लोक अनभिज्ञ आहेत. वीज ही उंच इमारत, ठिकाण, झाड आणि धातूकडे आकर्षित होते. त्यामुळे वीज चमकत असताना उंचीवर जाणे टाळावे, अशी सूचना तज्ज्ञांनी "सकाळ'च्या माध्यमातून केली आहे. 

एप्रिल ते मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस पडताना आणि सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये परतीचा मॉन्सून कोसळत असताना विजा चमकण्याचे प्रमाण जास्त असते. या काळात घरातून बाहेर पडताना वयस्कर मंडळी आवर्जून "वीज चमकायला लागली तर झाडाखाली थांबू नको', असे आवर्जून सांगतात. त्यामागे शास्त्र आहे. आतापर्यंत वीज कोसळण्याच्या घटनांचा मागोवा घेताना "नारळीचे झाड' पुढे येते. त्यामुळे वीज चमकत असताना सावध राहणे आणि सूचनांचे पालन करून धोक्‍यापासून शक्‍य तितके दूर जाणे, हाच पर्याय आहे. 

तीन दिवस, तीन मृत्यू 
वाळवा तालुक्‍यातील तुजारपूर येथील भूपाल पाटील यांच्यावर शेतात काम करताना वीज कोसळून ते मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबतचे राहुल पवार, अमोल पवार जखमी झाले. शिराळा तालुक्‍यातील धामवडे येथे भानुदास मादळे जनावरे चारायला माळावर गेले होते. तेथे त्यांच्या अंगावर वीज कोसलळी. वाळवा तालुक्‍यात उरुणवाडी येथील प्रताप जाधव शेतात काम करत असताना वीज कोसळून ठार झाले. सांगलीत पंचमुखी मारुती रस्त्यावरील नवीन इमारतीवर वीज कोसळली. 

तज्ज्ञांचे मत 
भूगोल विषयातील तज्ज्ञ व सांगलीवाडीतील पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा. नितीन गायकवाड म्हणाले, ""उंच झाडे विजेला आकर्षित करतात. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज उंच वास्तू किंवा ठिकाणांवर कोसळते. धातूच्या वस्तूकडे आकर्षित होते. अशा वातावरणात उंच ठिकाणी न जाता मोकळ्या मैदानात किंवा घरातच थांबावे. शक्‍यतो दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन दोन्ही हातांनी आवळून ठेवावे. हनुवटी जवळ घेतलेल्या गुडघ्यावर टेकवावी. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समूह विजेला आकर्षित करतात.'' 

मोबाईलवर बोलताय...? 
मोबाईलवर बोलत असताना वीज कोसळल्याची घटना नुकतीच घडून गेली. त्याबाबत मतमतांतरे आहेत, मात्र मोबाईलवर बोलताना तरंग लहरींकडे आकर्षित होऊन वीज कोसळते, असे काहींचे मत आहे. त्याचे पुरावे मिळतील किंवा मिळणार नाहीत, मात्र वीज चमकत असताना आपण "प्रयोगाचा उंदीर' ठरणार नाही, याची खबरदारी घ्या. मोबाईलवर बोलणे टाळा. 

वीज सूचना देते 
वीज चमकताना विद्युत प्रभार जाणवतो. अंगावरील केस उभे राहतात. त्वचेला झिणझिण्या आल्यासारखे वाटते. तेव्हा वीज आपल्यावर पडेल, अशी शक्‍यता बळावते हे लक्षात घ्यावे. त्वरित जमिनीवर बसलेल्या मुद्रेत जावे. इमारतीत धाव घ्यावी. गुंफाही सुरक्षित. उंच ठिकाणाखाली थांबू नये. 

वीज चमकत  असताना हे टाळा  
* मोबाईल, इंटरनेट वापरू नका 
* संगणक, टीव्ही, दूरध्वनी बंद ठेवा 
* चारचाकी वाहन सुरक्षित, बाहेर पडू नका 
* धातूच्या वस्तू घेऊन बाहेर जाऊ नका (उदा. छत्री, भांडी) 
* पाण्यात असल्यास त्वरित बाहेर या 
* होडी किंवा नावेत असल्यास किनाऱ्यावर पोहोचा 
* झाडाखाली अजिबात थांबू नका 
* उंच इमारतीच्या टेरेसवर थांबू नका 

Web Title: sangli news Electricity