सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !

शेखर जोशी
बुधवार, 5 जुलै 2017

अजितदादांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान 
आता महापालिका मिळविण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात तयारीनिशी उतरेल, पण स्थायी समितीत सत्ता भोगणारी राष्ट्रवादी महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे उत्तरदायित्व कसे टाळणार? कोणत्या तोंडाने ते महापालिकेच्या कारभाराचे समर्थन करणार, असे प्रश्‍न या मेळाव्यात सपशेल सेन्सॉर केले गेले. त्यामुळे पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी अशा गंभीर रोगावर इलाज न करताच कसे मैदानात उतरणार? 

आपल्या कडकपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या अजितदादांच्या दौऱ्याने थंड पडलेली राष्ट्रवादी खडबडून जागी झाल्यासारखी दिसते आहे, मात्र पक्षातील खदखद मिटणारी नाही. मुळात अनेक सरदार भाजपवासी झाल्यामुळे राष्ट्रवादी दहापैकी निम्म्या तालुक्‍यात पूर्ण नामशेषच झाली आहे. हे कर्तृत्व कोणाचे यावर आत्मपरीक्षण झाले नाही. ज्या वाळवा, तासगाव आणि मिरज तालुक्‍यात त्यांचे वर्चस्व होते, तिथेही या पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. नाही म्हणायला शिराळ्यात मानसिंगरावांनी भाजपचा विजयरथ रोखून येथील नगरपंचायत आपल्याकडे राखली... या सर्व गोष्टींची बारकाईने माहिती घेऊन अजितदादांनी नेत्यांचे कान टोचले असले तरी सर्वत्र पुन्हा टीम उभी करण्यासाठी सक्षम फळी पक्षाकडे आहे काय? 

अंतर्गंत धुसफूस सर्वंच पक्षांत असते. राष्ट्रवादीत तर आबांच्या हयातीतही जिल्ह्यातील दोन मातंब्बरांचे वाद विकोपाला गेल्याचे चित्र होते. मिरज दंगलीवरून झालेले कवित्व सर्वश्रुत आहे. त्या वेळी आबा व जयंतरावांतील संबंध मधूर करण्यासाठी इफ्तार पार्टीत खजूर भरवून मिलन झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले; पण आज आबा काळाच्या पडद्याआड गेले तरी तासगाव-इस्लामपूर हा तिढा संपलेला नाही, असेच चित्र आहे. आबा समर्थकांनी बैठकीत आपली खंत व्यक्‍त केली. तशीच खदखद महापालिका क्षेत्रातही आहे. एकंदरीत राष्ट्रवादीने या मेळाव्यासाठी गर्दीचा अंदाज नसल्याने 400 खुर्च्यांचे सभागृह घेतले होते; मात्र उभ्याने भाषण ऐकण्याची वेळ अनेक कार्यकर्त्यांवर आल्याचे अजितदादांच्या करड्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी शहराध्यक्ष संजय बजाज यांना पुढील वेळी चांगली सोय करण्याचा दमही दिला. अर्थात या छोट्या सभागृहातील गर्दीतही किती दर्दी कार्यकर्ते होते, हा विषयही वेगळाच आहे! ज्या महापालिकेत संजय बजाज नेतृत्व करतात तेथे राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून काय करतो? अशांसह अनेक मुद्दे चर्चिले गेले नाहीत. महापालिकेत विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याची माहिती अजितदादांना कोणी दिली नसावी. आता येणारी सर्वांत मोठी निवडणूक महापालिकेचीच असणार आहे. जिल्हा परिषदेचे केंद्र राष्ट्रवादीकडून निसटले आहे. आता महापालिका मिळविण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात तयारीनिशी उतरेल, पण स्थायी समितीत सत्ता भोगणारी राष्ट्रवादी महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे उत्तरदायित्व कसे टाळणार? कोणत्या तोंडाने ते महापालिकेच्या कारभाराचे समर्थन करणार, असे प्रश्‍न या मेळाव्यात सपशेल सेन्सॉर केले गेले. त्यामुळे पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी अशा गंभीर रोगावर इलाज न करताच कसे मैदानात उतरणार? 

सांगली-मिरज शहराच्या पातळीवरील चित्र असे तर जिल्ह्याच्या पातळीवरही सुखद चित्र नाहीच! विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव भाजपमध्ये गेले. त्यामुळे जयंत पाटील आणि विलासराव यांच्यातही सारे काही अलबेल नाही, हे मुद्दाम सांगायला नको. मुरब्बी दादांना हे सारे माहीत असले तरी त्यांनी यावर नेहमीच्या रोखठोक भाषेत काही सुनावले नाही. अर्थात नेतृत्वाचा जिल्ह्यात होल्ड राहिलेला नाही, हे अप्रत्यक्षपणे कानपिचक्‍या देत दादांनी सुनावलेच. 
""आम्हाला काय असेल तर उघड सांगा. जमत नसेल तर पदे सोडा....गटतट करणाऱ्यांनी पदावर राहू नये....नाती-गोती, पावण्या रावळ्याची भरती बंद करा, जुन्या कार्यकर्त्यांना बळ द्या.'' अशा शब्दांत अजितदादांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. अर्थात याला खूप उशीर झाला आहे. आता अनेक जण पक्ष का सोडून गेले? राष्ट्रवादीच्या राज्यातील 15 वर्षांच्या सत्तेत पदे, सन्मान कोणाला मिळाले? दोनच मंत्री आणि त्यांचे मतदारसंघ संपन्न का होत गेले? मग दुष्काळी फोरम जन्मली आणि त्याचेच रूपांतर आता भाजपच्या कमळातून फुलले आहे, पण अजितदादांनी सच्च्या कार्यकर्त्यांना बळ द्या, हे सांगायला थोडा वेळच केला, असे कार्यकर्ते मनातल्या मनात म्हणाले असतील. 

अर्थात या सगळ्या ऑडिटसाठी उशीर झाला कारण जतमध्ये विलासराव जगताप पक्षांतून गेल्यानंतर आणि आटपाडीतून राजेंद्रअण्णा आणि अमरसिंह हे देशमुख बंधू गेल्यानंतर राष्ट्रवादी शून्य आहे. कडेगावातून भाजपने राष्ट्रवादीच हायजॅक केला. पृथ्वीराज देशमुखांना मोठे स्थान मिळालेच आणि संग्रामसिंह जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. त्यांनी आपला बॅकलॉगच भरून काढला. पलूसमध्ये अरुण लाड आणि शरद लाड यांच्यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसत असले तरी देशमुख आणि लाड यांच्या जवळीकीमुळे येथे कॉंग्रेस संपली आणि भाजप वाढले. एकूणच सांगली हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता; पण तो किती पोकळ होता याचा अनुभव नेत्यांना येऊन गेला! आता तो पुन्हा उभा करणे हे इथल्या नेत्यांसाठी सोपे नाही. जयंतरावांपुढे तर इस्लामपूरसाठीही शर्थ करावी लागली आहे. 

टीका आणि योगायोग 
भाजपला एवढे भरभरून चार आमदार एक खासदार सांगलीने दिले; पण त्या भाजपने सांगलीला काय दिले, असा सवाल अजितदादांनी केला. यात तथ्य आहे. हाच प्रश्‍न सांगलीकरांनाही सतावतो आहे. एखादा खमक्‍या अधिकारीही येथे देण्यात भाजपने कंजुषी केली आहे, मात्र योगायोग असा की कालच म्हैसाळ, ताकारी या आघाडीच्या काळापासून रखडलेल्या योजनांना केंद्राकडून दोन हजार 90 कोटींचा निधी मिळाल्याचे जाहीर झाले. त्यामुळे आता भाजपला आम्ही काय केले, हे सांगण्यासाठी मोठा दिलासा केंद्राकडून मिळाला, हा एक योगायोगच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news ncp factions tussle despite power loss