वाळूतस्करांनी भिंत पाडून पळविले ट्रक

प्रताप मेटकरी
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

विटा - पंढरपूर परिसरातून सांगली जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्या मुजोर वाळूतस्करांनी काल (ता. ३०) मध्यरात्री तहसीलदारांनी जप्त केलेले वाळूचे ट्रक प्रवेशद्वाराची कुलूपे तोडून, कंपाउंडची भिंत पाडून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

विटा - पंढरपूर परिसरातून सांगली जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्या मुजोर वाळूतस्करांनी मंगळवारी (ता. ३०) मध्यरात्री तहसीलदारांनी जप्त केलेले वाळूचे ट्रक प्रवेशद्वाराची कुलूपे तोडून, कंपाउंडची भिंत पाडून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

वाळूतस्करांच्या या दहशत घडविण्याच्या प्रकारामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली. या प्रकरणी २५ तस्करांविरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. 

सर्व वाळूतस्कर सोलापूर जिल्ह्यातील असून, त्यांच्याकडील ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व (८) व गौणखणिज अधिनियम १९५५ प्रमाणे कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रंजना उंबरहंडे यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी  विट्याचे तलाठी सुभाष यादव यांना पंढरपूरहून विटामार्गे सांगलीला चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती काल रात्री साडेनऊच्या सुमारास मिळाली. त्यानुसार तहसीलदार रंजना उंबरहंडे यांच्या नेतृत्वाखाली मंडल अधिकारी एम. डी. पाटील, तलाठी एस. व्ही. यादव, विनायक पाटील, फैयाज मुल्ला, सत्यवान सुर्वे, संजय जाधव यांच्या पथकाने कुंडल रस्त्यावर एक वाळूचा ट्रक पाठलाग करून पकडला. त्या ट्रकच्या चालकाकडे वाळूचा रीतसर परवाना नव्हता. त्या ट्रकवर कारवाई करीत असताना चालकाने आपले नाव लक्ष्मण मारुती डोईफोडे (रा. अकलूज, जि. सोलापूर) असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी करीत असताना दहा ते पंधरा मिनिटांनी मागून आणखी चार वाळूचे ट्रक याच रस्त्यावरून आल्याने ते पथकाच्या जाळ्यात अलगद सापडले. तहसीलदार उंबरहंडे यांनी हे पाच ट्रक ताब्यात घेत कारवाईसाठी पोलिसांना बोलावले. 

या वेळी बाबा चंदनशिवे (रा. वेळापूर, ट्रक क्रमांक एमएच ४५- ३६५६), कुमार मेटकरी (रा. सांगोला, ट्रक क्रमांक एमएच ४५- १५८६), शहाजी चव्हाण (रा. तोडले बोधले, ट्रक क्रमांक एमएच १२- ९५३२), लक्ष्मण मारुती डोईफोडे (ट्रक क्रमांक एमएच १२- एमव्ही- ४६) व सुहास पवार (रा. वाटुंबरे, ट्रक क्रमांक एमएच ४५- ९६६४) या सर्व सोलापूर जिल्ह्यातील वाळूतस्करांना ताब्यात घेतले. त्यांचे ट्रक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यासाठी कर्मचाऱ्यांना सांगितले. या वेळी सुहास पवार याने त्याच्या मालकीचा वाळूचा ट्रक प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्याचा बहाणा करीत पळवून नेला. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास चार ट्रक प्रशासकीय इमारतीच्या कंपाऊंडच्या आत लावण्यात आले. या वेळी ट्रकच्या चाव्या महसूल कर्मचाऱ्यांना न देता तेथून चालकांनी पलायन केले.

यावर महसूल कर्मचाऱ्यांनी कंपाउंडच्या गेटला कुलूप लावले. तिथे अन्य एक वाळूचा उभा असलेला डंपर त्या गेटशेजारी लावला. त्यामुळे हे ट्रक पळून जाणार नाहीत, याची दक्षता घेतली होती. परंतु, या वाळूतस्करांनी अंधाराचा फायदा घेत या डंपरची बॅटरी सुरू केली. हा डंपर पुढे नेऊन प्रवेशद्वाराची कुलपे तोडली. ट्रक प्रवेशद्वाराबाहेर काढून पळवून नेले. ट्रक पळवून नेण्याच्या इराद्याने या तस्करांनी ट्रक अक्षरशः कंपाउंडवर घालून ती भिंत पाडली. या प्रकरणी २५ जणांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, त्यांच्याकडून ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी श्रीकांत ऊर्फ किशोर मासाळ, लक्ष्मण दोईफोडे, रणजित लक्ष्मण दोईफोडे आणि तुकाराम अभिमान कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) व (८) व गौणखनिज अधिनियम १९५५ प्रमाणे कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रंजना उंबरहंडे यांनी सांगितले.

मुजोर वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज
शहरासह तालुक्‍यात अनेक वाळूतस्कर सक्रिय असतानाच सोलापूर जिल्ह्यातील वाळूतस्करांनी वाळूचे ट्रक पळवून नेण्याच्या धक्कादायक प्रकाराने कहरच केला आहे. यातून वाळूतस्करांची मुजोरी उघड झाली आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असला तरी अशा मुजोर वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज आहे.

Web Title: Sangli News sand smugglers break wall and stolen truck