मध्यरात्रीच्या पार्ट्या कुणाच्या आशीर्वादाने?

मध्यरात्रीच्या पार्ट्या कुणाच्या आशीर्वादाने?

‘मद्य यंत्र’ पावतीपुरते - वचक शून्य - बार, हॉटेल, ढाबे झालेत बेलगाम 

सांगली - मिरज रस्त्यावर कार अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दडलेल्या अनेक प्रश्‍नांनी डोके वर काढले. रात्री ११ वाजता हॉटेल, बार बंद करण्याचा नियम असताना पहाटेपर्यंत चालणाऱ्या मद्यपार्ट्या, त्याकडे पोलिस यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष, दारू पिऊन वाहन चालविण्याऱ्यांविरुद्धची ‘पावती’ पुरती कारवाई आणि अशा अपघातानंतर त्याच्या मुळाशी न जाता वरवरचे सारवण हे सारे विदारक आहे. रात्रीच्या काळोखात सांगली शहरात काय काय चालते, याचा कानोसा ही यंत्रणा कधी घेणार?

पुष्पराज चौकातील कार अपघात रात्री दोननंतर झाला. हे तरुण कुठून आले, याविषयी मतमतांजरे सुरू आहेत. तूर्त एका हॉटेलमध्ये पार्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे गृहित धरल्यास त्या हॉटेलपासून अपघात झालेल्या स्थळाचे अंतर  चार किलोमीटर म्हणजे सात ते आठ मिनिटांचे.

हॉटेल नियमाप्रमाणे बंद झाले होते का? असेल तर मग या तरुणांनी पुढचे दोन तास कुठे काढले? नसेल तर मध्यरात्री दोनपर्यंत हॉटेल सुरू होते का? या मुळाशी पोलिसांना जायचे आहे का? हा प्रश्‍न केवळ ‘त्या’ हॉटेलपुरता मर्यादित नाही. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालणारी अनेक हॉटेल्स सांगली-मिरजेत आहेत. महामार्गालगत काही ढाबे आहेत, जे दोनपर्यंत सुरू असतात. जेवणाची सोय म्हणून ठीक, मात्र दारूचे अड्डे इतक्‍या उशिरा चालवणे गुन्हाच ठरवला गेला पाहिजे. या अपघातानंतर हा मुद्दा खोदून काढला जाईल का, यावरही शंकाच आहेत.  हे तरुण बाहेरगावाहून आले, असेही काहींना वाटते. तसे असेल तर त्या मार्गात पोलिस तपासणीचा एकही नाका नव्हता का? त्यांनी ह्यांना रोखले नाही का? पोलिसांकडून अधेमधे मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई होते. त्याचा ‘हंगाम’ असतो का? वसुलीचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी अशा कारवाया व्हाव्यात, हेच धक्कादायक आहे. तिघांचा बळी गेल्यानंतर तरी या प्रश्‍नांचे उत्तरे शोधली पाहिजेत.  

पोहे, सिगारेट अन्‌ पान
एसटी स्थानक परिसरात मध्यरात्रीनंतर (पहाटे) दोन, तीन वाजता गेलात तरी पोहे मिळतात. ही पोहे खायची वेळ आहे का? तरीही पोह्याचा गाडा उत्तम चालतो. कारण मध्यरात्रीपर्यंत टपोरीगिरी करून, कट्ट्यावर चकाट्या पिटून आणि अपचन होईपर्यंत मद्यप्राशन करून अनेकजण इथे स्टाईल म्हणून पोहे खायला येतात. काही चौकात मसाला दुधाचे गाडे सुरू असतात तर काही ठिकाणी फिरत्या पानपट्ट्यांचे अड्डे आहेत. पान, सिगारेट मध्यरात्री एक, दोन वाजताही मिळते. 

आभासी आत्मविश्‍वास
बहुतांश व्यक्ती अति दारू पिल्यानंतर ‘मीच कार चालवणार, माझ्यावर विश्‍वास नाही काय?’ अशी भूमिका घेतात. असे का होते, याबाबत सांगलीतील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञाने उलगडा केला. ते म्हणाले, ‘‘अति दारूु पिल्यामुळे एक प्रकारचा आभासी आत्मविश्‍वास संचारतो. मी म्हणजे सर्वशक्तिमान आहे, असे वाटायला लागते. त्याचे शास्त्रीय कारण असे, की दारू ही ‘बेस्ट सॉल्व्हंट’ आहे. तिच्यात एखादी गोष्ट सहज विरघळून जाते. अर्थातच चिंता आणि भीतीदेखील दारूत विरघळून जाते. त्यांना वास्तवाचे भान राहत नाही.’’
 

हुक्का पार्लर
शहरालगत विस्तारित पट्ट्यात एक-दोन किलोमीटर अंतरावर काही इमारतीत नेमके चालते काय? याचा कानोसा पोलिस यंत्रणेने कधी घेतलाय का? इथे हुक्का पार्लरसह दारूचे अड्डे सुरू झाले आहेत. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नवे धंदे फोफावले आहेत. इथे उच्च शिक्षणाच्या निमित्ताने काही ‘अतिउच्च’ वर्गातील तरुणाईचे वास्तव्य आहे. त्यांच्यासह शहरातील हाय-फाय तरुणाई त्यांचे ग्राहक असल्याचे सांगितले जाते. हा विषय केवळ अपघातांपुरता मर्यादित नाही. अनेक गुन्ह्यांचे उगमस्थान अशा ‘सेंटर’मध्येच आहे. 
 

विरोधच करावा
हे मानसोपचार तज्ज्ञ सुचवतात की, एखादी व्यक्ती असा हट्ट करत असेल तर मित्रांपैकी किमान एखादा तरी कमी पिलेला किंवा न पिलेला असतो. त्याने सावध व्हावे. तू गाडी चालवणार असशील तर मी गाडीत बसणारच नाही. भले, मला रस्त्यावर झोपावे लागले तरी चालेल, अशी ठाम भूमिका घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com