सांगली : एसी नाही, तर नाटकाचा शो नाही

नाट्यगृहाकडे कलाकारांची पाठ
drama
dramasakal

सांगली: नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत गेल्या अनेक वर्षांत वातानुकूलित नाट्यगृहाची उभारणी होऊ शकलेली नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. वातानुकूलित नाट्यगृह नसल्याने मोठे कलाकार येथे प्रयोग सादरीकरणास इच्छुक नसतात, ही वस्तुस्थिती आहे. शेजारील कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात वातानुकूलित नाट्यगृहे असताना नाट्यपंढरी मात्र या सुविधेपासून वंचितच राहिली आहे.

एप्रिल आणि मे म्हणजे सुटीचा हंगाम असतो. वेगवेगळ्या करमणुकीच्या कार्यक्रमाची, नाटकाची, गाण्यांच्या कार्यक्रमाची रसिकांना प्रतिक्षा लागून राहते. त्यामुळे सुटीचा काळ म्हणजे कलाकार मंडळींसाठी मोठी संधीच असते. परंतु, एप्रिल व मे महिन्यात कार्यक्रम करताना त्यांना वातानुकूलित नाट्यगृहाची आवश्‍यकता भासू लागली आहे. तीन वर्षापूर्वी एका नाट्यप्रयोगावेळी वैभव मांगले हे सांगलीत उकाडा सहन न झाल्यामुळे चक्कर येऊन पडले. तेव्हा वातानुकूलित नाट्यगृहाचा विषय चर्चेत आला. आजही बरीच मोठी कलाकार मंडळी वातानुकूलित नाट्यगृह नसेल तर प्रयोग करण्यास राजी नसतात. तसेच कलाकार मंडळी स्टेजवर कला सादर करताना घामाने चिंब झालेली किंवा कपाळ, मान पुसताना पाहणे रसिकांनाही आवडत नाही.

नाट्यपंढरी सांगलीत महापालिकेच्या नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. भावे नाट्य मंदिर हे ट्रस्टमार्फत चालवले जाते. तेथेही निधी अभावी वातानुकूलित यंत्रणा नाही. त्यामुळे एप्रिल, मे मध्ये सांगलीत नाट्यप्रयोग किंवा इतर गाण्यांचे कार्यक्रम सादर करण्यास कलाकार ‘नको रे बाबा’ असे म्हणतात. नाट्यपंढरीसाठी ही खरीच शोकांतिका म्हणावी लागेल. गेल्या २४ वर्षात महापालिकेला तसेच तत्पूर्वी नगरपालिकेला अद्ययावत नाट्यगृह उभारता आले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

अद्ययावत नाट्यगृह कधी

आमदार सुधीर गाडगीळ यांनी नुकतेच अद्ययावत नाट्यगृह उभारणार असल्याची घोषणा केली आहे. सांस्कृतिक अबकड कल्चरल ग्रुपनेही नाट्यगृहाचा प्रस्ताव बनवला आहे. परंतु, निधीअभावी तो प्रत्यक्षात सुरू झाला नाही. त्यामुळे अद्ययावत नाट्यगृहाची नाट्यपंढरीला प्रतीक्षा आहे.

रसिकही वंचित...

सांगलीत एका संस्थेच्या कार्यक्रमास नाट्यगृहात ‘एसी’ नसल्याने गीतकार गुलजार यांनी नकार कळविला. तसेच, अभिनेते प्रशांत दामले यांच्यासारखे मोठे कलाकारही अशा उकाड्यात सांगलीत येण्यास नकार देतात. त्यामुळे ऐन सुटीत मोठ्या कलाकारांच्या कार्यक्रमापासून रसिक वंचित राहतात.

इतर जिल्ह्यांतील स्थिती

कोल्हापुरात महापालिकेचे केशवराव भोसले नाट्यगृह, कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सातारला शाहू कला मंदिर, सोलापूरला हुतात्मा स्मृती मंदिर आदी नाट्यगृहे वातानुकूलित आहेत. परंतु, नाट्यपंढरी सांगली मात्र यापासून वंचित आहे.

निधी सभागृहासाठी...

जिल्ह्यात अनेकांनी शासनाकडून नाट्यगृहासाठी म्हणून निधी आणून प्रत्यक्षात सभागृह बांधले आहे. त्याठिकाणी नाटकाचे प्रयोग होऊ शकत नाही. ध्वनियंत्रणा व इतर सुविधांअभावी तेथील प्रयोग रसिकांनी बंद पाडले. त्यामुळे ही सभागृहे राजकीय कार्यक्रम व इतर कार्यक्रमांसाठीच उपयोगी ठरत आहेत.

नाट्यगृह हे खरे तर रसिक मंडळींच्या योगदानातून उभे राहण्याची गरज आहे, तर ते प्रत्येकाला आपलेसे वाटेल. नाट्यपंढरीतील अनेक मंडळी नाटकासाठी काहीच करीत नाहीत, ही दुर्दशा म्हणावी लागेल. आमच्या संस्थेमार्फत नाट्यगृहाचा प्रस्ताव बनविला आहे. परंतु, निधीअभावी तो प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नाट्यकर्मी व संबंधित संस्थांना बोलवून नाट्यगृह उभारणीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- शरद मगदूम, अध्यक्ष, अबकड कल्चरल ग्रुप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com