
सांगली : राष्ट्रवादीविरोधात भाजप-काँग्रेस
सांगली: महापलिकेच्या वतीने साकारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण येत्या २ एप्रिलला होत आहे, मात्र या समारंभाला आता राजकीय वळण लागले आहे. हा कार्यक्रम सर्वपक्षीय लोकोत्सव व्हावा, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे यानिमित्ताने पक्षीय अजेंडा पुढे रेटायचा असे धोरण दिसून आल्याने आधी काँग्रेस आणि नंतर भाजपने नाराजीचा सूर लावला आहे. भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीला एकाकी टाकले आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या सत्ताकाळात या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांनी या स्मारकासाठी सुरुवातीपासून पुढाकार घेतला. जिल्ह्यातील धनगर समाजाला सांगलीत हक्काची जागा असावी. समाजातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचे हे केंद्र व्हावे, हा या स्मारकाचा हेतू स्पष्ट करण्यात आला. भाजपच्या पालिकेतील सत्ताकाळात स्मारकाचे उद्घाटन व्हावे, असाही प्रयत्न होता; मात्र काही कारणास्तव तो कार्यक्रम होऊ शकला नाही. राज्यातील सत्तांत्तरानंतर पालिकेतही सत्तांतर घडले आणि राष्ट्रवादी सर्व सूत्रे ताब्यात घेत महापालिकेचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे.
मित्रपक्ष काँग्रेसलाही शक्य तिथे डावलत राष्ट्रवादीचा पालिकेत कारभार सुरू आहे. स्मारक उद्घाटनाची तारीख ठरवण्याबाबत, तसेच या समारंभासाठी काँग्रेसच्या राज्यातील नेतेमंडळींना सोबत न घेताच महापौरांनी श्री. पवार यांची भेट घेतली. राज्यात आणि पालिकेत या दोन्ही पक्षांची आघाडी असताना कार्यक्रमावेळी का डावलले यावरून पहिल्यांदा उपमहापौरांसह सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपने निवेदन देत सर्व सहकारी नगरसेवकांसोबत आयुक्तांना या समारंभाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी केली. त्यामुळे हा मुद्दा राजकारणाचा होणार हे स्पष्ट होते, तसेच झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन आधीच आम्ही सामान्य धनगर बांधवांच्या हस्ते करू, अशी घोषणा केली आहे. कार्यक्रमादिवशी निदर्शने केली जातील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच सर्व समाजाचा आनंदोत्सव ठरावा, अशा या कार्यक्रमाबाबत सुरू असलेले राजकारण सर्वसामान्य नागरिकांना मात्र किळस वाटावे, असे सुरू आहे. भाजपकडून सुरू असलेल्याला राजकारणाला आधी राष्ट्रवादीने आपल्या एककल्ली कारभाराने खतपाणी घातले आहे.
Web Title: Sangli Political Turn Ahilya Devi Program Bjp Congress Against Ncp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..