
सांगलीमध्ये महिनाभरात साडे पंधरा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
सांगली : जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा १३ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. काही कारखान्यांच्या हंगामास महिना झाला आहे; तर काहींनी दिवाळीनंतर सुरवात केली. आजअखेर या कारखान्यांनी १५ लाख २८ हजार टन उसाचे गाळप केले आहे; तर १५ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १०.१६ इतका आहे.
जिल्ह्यात यंदा महापुराचा ऊस क्षेत्राला फटका बसला. त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. ऑक्टोबर महिन्यात गाळप करण्यास परवानगी मिळाली. काही कारखान्यांनी दिवाळीपूर्वी तर काहींनी दिवाळीनंतर हंगामास प्रारंभ केला. जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखाने सुरू होते; तर यंदा तासगाव आणि नागेवाडी कारखाने थकीत एफआरपीमुळे सुरू होऊ शकलेले नाहीत. महाकाली, माणगंगा, केन ॲग्रो हे कारखाने यापूर्वीच बंद पडले आहेत. त्यामुळे यंदा १३ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू ठेवला आहे.
यंदाही एकरकमी एफआरपीवरून शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष अनुभवण्यास आला. दत्त इंडिया व दालमियाने एकरकमी एफआरपी जाहीर केली. त्यामुळे इतर कारखाने देखील एकरकमी एफआरपी जाहीर करतील, अशी शक्यता होती. परंतु एकरकमी एफआरपीला यंदाही इतर कारखानदारांनी कोलदांडा दिल्याचे दिसून येते. काही कारखाने एकरकमी एफआरपी देण्यास तयार आहेत. परंतु घोषणा करण्यात त्यांना अडचणी असल्याची माहिती पुढे येते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी यंदा दिली; तर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडल्याचे चित्र दिसून येते. हंगाम सुरू झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनही आता थंडावले आहे. आता पहिला हप्ता कितीचा मिळणार? या कडेच शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
गाळप आढावा (२४ नोव्हेंबरअखेर)
कारखाना...ऊस गाळप (मे.टन)...साखर उत्पादन (क्विंटल)...उतारा
दत्त इंडिया (वसंतदादा)...१.५८...१.६६...१०.५
राजारामबापू साखराळे...१.४९...१.६३...१०.९६
हुतात्मा किसन अहीर...१.०७...१.०२...९.५४
राजारामबापू वाटेगाव...१.०४...१.१०...१०.५३
राजारामबापू जत...०.६१...०.५४...८.८९
सोनहिरा...१.९४...२.२०...११.३१
क्रांतिअग्रणी...१.८०...२.०२...११.१८
राजारामबापू कारंदवाडी...०.९४...१.०५...११.१७
मोहनराव शिंदे...१.०७...१.०७...९.९६
दालमिया (निनाईदेवी)...०.७८...०.८६...१०.९९
उदगिरी शुगर...१.१६...१.१३...९.७
सद्गुरू श्री श्री...१.७५...१.२१...६.९३
एकूण...१५.२८...१५.५२...१०.१६