सांगलीत चार महिन्यात सरासरी 26 टक्के अधिक पाऊस 

विष्णू मोहिते 
Saturday, 3 October 2020

यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पाऊस 514 मिलिमीटर असून, यंदा 649 मिलिमीटर पाऊस झाला.

सांगली : यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पाऊस 514 मिलिमीटर असून, यंदा 649 मिलिमीटर पाऊस झाला. सुरवातीच्या काळात दिलेली ओढ शेवटी मात्र भरून काढली आहे. 

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मॉन्सूनही वेळेत दाखल झाला. मात्र, यानंतरच्या प्रवासात निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत राहिला. सुरवातीच्या टप्प्यात मॉन्सूनचा जोर नेहमीसारखा नव्हता. जून, जुलैमध्ये झालेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये अधिक पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले, तरी तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे. 

यंदा जून, जुलैमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. त्यातच घाटमाथ्यावरही पाऊस न झाल्याने बहुतांश धरणे जुलैअखेरपर्यंत कोरडी होती. मात्र, सुरवातीला कमी झालेल्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दमदार हजेरी लावली. चार महिन्यांच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यात कमी म्हणजेच सरासरीच्या सहा टक्के अधिक पाऊस झाला. सोलापुरात 25 टक्के, कोल्हापूरला 23 टक्के पाऊस पडला. सांगली, कोल्हापूरमध्ये 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील वारणा धरणात 34.40 टीएमसी पाणीसाठा असून, धरण 100 टक्के भरले आहे. कोयना, दूधगंगा, तुळशी, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी धरणेही 100 टक्के भरली आहेत. धोम धरणात 13.27 टीएमसी, कण्हेर धरणात 10.03 टीएमसी पाणीसाठा आहे. 

पाऊस असा... 
सांगली जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः मिरज- 568.2, तासगाव- 512.1, 
कवठेमहांकाळ- 583, वाळवा-इस्लामपूर- 627.4, शिराळा- 1312, कडेगाव- 577.2, पलूस- 484.4, खानापूर-विटा 765.2, आटपाडी- 739, जत- 398.4. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli received an average of 26 per cent more rainfall in four months