
चोरावर मोर ; एकीकडे "रेमडेसिव्हिर'साठी धावाधाव तर दुसरीकडे चोरी; नेमका सुत्रधार कोण?
सांगली : कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची "रेमडेसिव्हिर'साठी राज्यभर धावाधाव सुरू आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील स्थिती बरीच. हे औषध मिळाले नाही म्हणून मृत्यू नाही... ऑक्सिजन बेड मिळाला नाही म्हणूनही मृत्यू झाला, अशी वेळ अद्याप कोणावरही जिल्ह्यात आलेली नाही. कोरोनाविरोधातील ही लढाई सर्व यंत्रणा लढत असताना खुद्द "सिव्हिल'मधून रेमडेसिव्हिरची चोरी पकडली जाते, हे एकूण यंत्रणेवर भले मोठे प्रश्न उपस्थित करते. त्यामुळेच या चोरांचे आश्रयदातेही शोधले पाहिजेत.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी करणारा सुमित हुपरीकर हा सिव्हिलमधील परिचारक आहे. तो कायमस्वरूपी सेवेत आहे. त्याची नोकरी शाश्वत आहे. चांगला पगार आहे. कोरोनाविरोधातील लढाई सारे ताकदीने लढत असताना त्याने एक कुपी तीस हजार रुपयांना विकली. दुसरी कुपी विकताना तो रंगेहाथ सापडला. आता हे औषध बाहेर निघाले कसे? प्राथमिक तपासात त्याने रुग्णालयाच्या भांडार विभागातूनच ते लांबवल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रती रुग्ण सहा डोस दिले जातात. मात्र रुग्णाचा मृत्यू झाला, तर शिल्लक डोसमधील औषधांची काळ्याबाजारात विक्री केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात यातील आणखी काही बाबी स्पष्ट होतील. मात्र हुपरीकरने यंत्रणेच्या एकूण विश्वासार्हतेलाच नख लावले. ही बाब छोट्या चोरीची असती, तर बेदखलही केली गेली असती. मात्र सध्या ज्या औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्यभर रुग्णांच्या नातलगांची वणवण सुरू आहे. अशा काळात ही चोरी उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्या मुळापर्यंत जाऊन लोकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचली पाहिजे.
यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात. रुग्णालयास पुरवठा होणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवर औषध प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानेच ही लस थेट खरेदी केली असल्याने, तिच्या खरेदीपासून ते वापरापर्यंत आणि शिल्लक साठ्यापर्यंतचा सगळा हिशेब चोख ठेवणे, ही रुग्णालयातील भांडार विभागाची जबाबदारी आहे. आत्तापर्यंत शहरात या औषधाच्या काळाबाजाराची दबक्या आवाजात चर्चा होती. यापूर्वीही असे प्रकार घडलेले असू शकतात. त्यामुळे रुग्णालयाच्या औषध नोंदीची प्रक्रिया तपासणे गरजेचे आहे.
खासगी हॉस्पिटल्समध्येही प्रकार
गतवर्षी पहिल्या कोरोना लाटेवेळी अशा स्वरुपाच्या तक्रारी खासगी हॉस्पिटल्सबाबतही पुढे आल्या होत्या. तेव्हा तुटवडा निर्माण झाला असता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी नातलगांना रेमडेसिव्हिर विकले होते. त्याबद्दल एका हॉस्पिटल प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यास कामावरून कमी केले. एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचे इंजेक्शन चोरीस गेले. त्यांचेच चोरलेले इंजेक्शन त्याच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये विकण्याचा प्रयत्न झाला.
औषधाबाबत अभ्यास नाही...
रेमडेसिव्हीरची गरज ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे. ती उपलब्ध करून देणे ही जबाबदारी प्रशासनाची आहे. जिल्हाधिकाऱ्या समवेतच्या बैठकीत बैठकीत तज्ज्ञांनी या औषधाच्या गंभीर अनुषंगिक परिणामाबद्दल सांगितले होते. हे औषध विषाणू मारत नसून विषाणूंची पुननिर्मिती थांबवते. त्याचा काही प्रमाणात फायदा होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागते त्यांनाच ते दिले जाते. आजाराच्या पहिल्या नऊ दिवसांत या औषधाचा वापर झाल्यास त्याचा फायदा होतो. औषधाच्या वापराबाबत इतकी मतभिन्नता असतानाही या औषधांची मागणी कमी होत नाही. गतवर्षी ज्या रुग्णांवर या औषधांचा मारा झाला त्यांच्यावरील परिणामांचा सखोल अभ्यास जिल्हास्तरावर कोणा डॉक्टरांनी केलेला नाही. सारे काही प्रयोगाच्या पातळीवर सुरू आहे. याकडे संबंधित जबाबदार व्यक्तींनी लक्ष दिले पाहिजे.
"अन्न- औषध'ची जबाबदारी
रेमडेसिव्हीरचा काळाबाजाराबद्दल अन्न औषध विभागाच्या निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे. "सिव्हिल'मधील औषध भांडार व तिथल्या व्यवस्थापनाशी अन्न औषधचा संबंध नाही, असं या विभागाचं मत आहे. मात्र या औषधाचा नियमित पुरेसा पुरवठा होईल, हे पाहणे मात्र त्यांची जबाबदारी आहे. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सांगली दौऱ्यात हा विषय चर्चेत आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. दररोज जिल्ह्यात दोनशे ते तीनशे रेमडेसिव्हिरचा पुरवठा होत आहे.
Edited By- Archana Banage
Web Title: Sangli Remdesivir Thief Case Covid 19 Update Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..