सांगली:शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education News

सांगली:शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर

सांगली: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि विजय सोनवणे हे पावणेदोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ सापडले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील भ्रष्ट अर्थकारणाची दबक्या आवाजात नेहमीच चर्चा सुरू असते. मात्र, तेच शिक्षणाधिकारी लाच घेताना सापडल्याने या विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या शासकीय सेवेचा हा अखेरचा महिना असल्याचे समजते. त्यामुळे महिन्यानंतर आपण सेवेतच नसणार हे माहित असल्याने त्यांनी होता होईल तेवढी माया जमवण्याचा गोरख धंदा सुरू केला होता की काय अशी शंका येत आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्य ॲड. शांता कनुंजे यांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली होती. विष्णू कांबळे यांच्या शिक्षण विभागातील कारभाराची खातेनिहाय चौकशीची मागणीही त्यांनी केली होती. ॲड. कनुंजे यांनी कांबळे यांच्या कारभाराबाबत १२ मुद्दे उपस्थित केले होते. त्या सर्व मुद्द्यांवरून त्यांनी शिक्षण समितीच्या शेवटच्या बैठकीत त्यांना धारेवर धरले होते.

सभेतील ठरावानुसार कार्यवाही न करणे, शिक्षकांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव निकाली काढण्यास विलंब लावणे, शिक्षकांच्या निवड श्रेणीच्या प्रस्तावाला विलंब लावणे, शासनाच्या परिपत्रक, आदेशांची वेळेत अंमलबजावणी न करणे, अपील प्रकरणांची सुनावणी विहीत पद्धतीत न करणे आदी तक्रारी ॲड. शांता कनुंजे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीतच केल्या होत्या.

या बरोबरच स्वतंत्र भारत पक्षानेही कालच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवेदन दिले आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी माध्यमिक विभागात आल्यापासून ज्या मान्यता दिल्या आहेत, त्यांची चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कांबळे यांनी शासन आदेश डावलून वैयक्तिक मान्यता दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. तासगाव मधील एका संस्थेतील सेवाज्येष्ठतेनुसार एका शिक्षिकेची विनाअनुदानितकडून अनुदानित विभागात बदली करण्याचा प्रस्ताव केवळ लाचेची मागणी मान्य न झाल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी बाजूला ठेवला आणि त्याच संस्थेतील दुसऱ्या शिक्षकाला बदली दिली. मात्र, त्या शिक्षिकेने हे प्रकरण वरपर्यंत ताणल्यामुळे अखेर शिक्षण उपसंचालकांच्या तक्रार निवारण समितीने कांबळे यांना निर्णय बदलून संबंधित शिक्षिकेला अनुदानित विभागाकडे बदली देण्याचा निकाल दिला.

विविध विभागांनाही कीड

जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षणच नव्हे तर अनेक विभागांना लाचेची कीड लागली आहे. ठेकेदार अधिकाऱ्यांची साखळी तयार झाली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. एकाबाजूला मॉडेल स्कूल, मॉडेल पी. एच. सी.ची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला अशी लाचखोरांची कीड जिल्हा परिषदेला पोखरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वच विभागात भ्रष्टाचार स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे.जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षणच नव्हे तर अनेक विभागांना लाचेची कीड लागली आहे. ठेकेदार अधिकाऱ्यांची साखळी तयार झाली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. एकाबाजूला मॉडेल स्कूल, मॉडेल पी. एच. सी.ची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला अशी लाचखोरांची कीड जिल्हा परिषदेला पोखरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वच विभागात भ्रष्टाचार स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे.

Web Title: Sangli Reputation Education Department Rise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top