सांगली : मार्ग एकेरी बनले दुहेरी

वाहनांची संख्या वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
मार्ग एकेरी बनले दुहेरी
मार्ग एकेरी बनले दुहेरीsakal

सांगली : शहरात वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी सुरू केलेले एकेरी मार्ग सध्या दुहेरी बनलेत. वाहनांची संख्या वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. एकेरी मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. एकेरी मार्गाचा नागरिकांसह वाहतूक पोलिसांनाही विसर पडला आहे. या ठिकाणची कोंडी आणि कर्णकर्कश हॉर्नपासून सुटका होण्यासाठी आता वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाला कठोर निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

बस स्थानकासमोरील पूर्व-पश्‍चिम रस्ता अनेक वर्षांपासून एकेरी मार्ग आहे. पूर्वी तेथे वाहतूक पोलिस असल्यामुळे उल्लंघन होत नव्हते. आता अनेकजण राजरोस नियम मोडतात. बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता हा एकेरी असल्याचा विसर पडू लागला आहे. कापडपेठेतील मुख्य रस्ता, तरुण भारत स्टेडियम ते मारुती रस्ता, छत्रपती शिवाजी पुतळा ते शिवाजी मंडई, तरुण भारत स्टेडियम ते हरभट रस्ता, रिसाला रस्ता ते गरवारे कन्या महाविद्यालय चौक, राणी सरस्वती कन्या शाळेसमोरील रस्ता, महापालिकेसमोरील रस्ता, कर्नाळ चौकी ते पटेल चौक यासह काही रस्त्यावर येथे एकेरी मार्ग होता, असे सांगावे लागते. एकेरी मार्गाचे चिन्ह दाखवणारे फलक गंजलेत, तर काही ठिकाणी फलक मोडकळीस आले आहेत. एकेरी मार्गावर सध्या क्वचितच वाहतूक पोलिस दिसतात.

एकेरी मार्ग दुहेरी बनल्यामुळे शहरातील बस स्थानक परिसर व मुख्य पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. एकेरी मार्गावरील दुकानांसमोर पार्किंगमुळे रस्ता आणखी अरूंद बनला आहे. शनिवारच्या बाजारात तर दिवसभर सर्वत्र कोंडी दिसून येते. त्यामुळे पुन्हा एकदा एकेरी मार्ग सुरळीत करण्याची गरज भासू लागली आहे.

काय करायला हवे

n एकेरी मार्गाचे फलक ठळकपणे लावावेत

n एकेरी मार्ग सुरू होणाऱ्या ठिकाणी पोलिस तैनात असावा

n रस्त्यावरील पार्किंगवर तत्काळ कारवाई हवी

n दंडात्मक कारवाई केल्यास नियम मोडणे टाळले जाईल

नियम मोडण्यापूर्वीच रोखा

काही वर्षांपूर्वी एकेरी मार्ग जिथे संपतो तिथे वाहतूक पोलिस पावती फाडण्यासाठी सज्ज दिसत होता. त्याऐवजी जेथे एकेरी मार्ग सुरू होतो, तेथेच नियम मोडण्यापूर्वी वाहनधारकांना रोखण्यासाठी पोलिस तैनात असणे आवश्‍यक आहे.

शहरातील एकेरी मार्गावर दोन्ही टोकाला वाहतूक पोलिस तैनात करण्याचा प्रयोग केला. तेव्हा वादावादीचे प्रसंग घडतात. सीसीटीव्ही फुटेजवरून आम्ही ई-चलनद्वारे दंडाच्या नोटिसा पाठवतो. काही ठिकाणी फलक गंजले असून मोडकळीस आलेत. त्याबाबत महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. पेठांमध्ये काही ठराविक व्यापाऱ्यांच्या गाड्याच घरे-दुकानांसमोर पार्किंग केलेल्या दिसतात. त्यामुळे कोंडी होते. शाळा सुरू होत असल्यामुळे एकेरी मार्गांची कडक अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनीही नियम न मोडता सहकार्य करावे.

-प्रज्ञा देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

हरभट रस्त्यावरील सम-विषम पार्किंगमुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर चार दिवसांपूर्वी दोन्ही बाजूने पार्किंग करण्यास सुरवात झाली आहे. एकेरी मार्ग सुरळीत होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे फलक लावण्यासाठी पाठपुरावा करू. तसेच काही खासगी संस्था, कंपन्यांच्या पुढाकाराने असे फलक उभे केले जाऊ शकतात. पार्किंगची अडचण दूर करण्यासाठी वाहनतळ विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच कोंडी फुटेल.

- शेखर माने, माजी नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com