Sangli Shaheed Jai Singh merged with Bhagat Anant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद

Sangli : शहीद जयसिंग भगत अनंतात विलीन

खानापूर : सांगली जिल्ह्यातील खानापूरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत (वय ४०) यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. खानापुरात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर दुपारी बाराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीन बॉर्डरवर कर्तव्यावर असताना हिमस्खलनात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

जवान नायब सुभेदार जयसिंग भगत यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी नऊ वाजता खानापूर येथे आणण्यात आले. खानापूर शहरातून ‘शहीद जवान अमर रहे’, ‘नायब सुभेदार जयसिंग बाबू भगत अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत विविध विद्यालयांचे शालेय विद्यार्थी, तरुण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी अकराच्या दरम्यान भगत यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांना, उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले. पत्नी व लहान मुलांचे निःशब्द चेहरे देशासाठी सर्वस्व गमावलेल्याची साक्ष देत होते.

गोरेवाडी रस्त्यालगतच्या पटांगणावर जवान भगत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलाच्या २२, मराठा लाइट इन्फंट्रीच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लष्करी व शासकीय मानवंदना देण्यात आली.

राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलिस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

शहीद जयसिंग भगत हे सियाचीन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वी सियाचीन येथे बर्फवृष्टी झाली होती, त्यावेळी भगत झोपेत होते. झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोम्यात गेले. ही घटना सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

त्यांना सैन्यदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांना चंदीगड येथे दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.