सांगली : शिक्षक बँकेचे नवखे सत्ताधारी विरोधकांवर भारी ठरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगली : शिक्षक बँकेचे नवखे सत्ताधारी विरोधकांवर भारी ठरले

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या आजच्या वार्षिक सभेत सर्व विषयांना सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात मंजुरी घेत शिक्षक बँकेचे नवखे सत्ताधारी विरोधकांवर भारी ठरले. सभासदांनी मोठ्या विश्वासाने शिक्षक बँकेची सत्ता स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या ताब्यात दिली आहे. हा विश्वास शंभर टक्के सार्थ ठरवू, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी या वेळी दिली.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा आज माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिता काटे, संचालक रुपाली गुरव, शामगोंड पाटील, धनाजी घाडगे, संजय महिंद, अशोक घागरे, शिवाजी जाधव, फत्तू नदाफ, नितीन चव्हाण, अजित पाटील, गांधी चौगुले, शब्बीर तांबोळी, शरद चव्हाण, अमोल शिंदे, मिलन नागणे, राहुल पाटणे, अमोल माने, सचिन खरमाटे, कृष्णा पोळ, श्रीकांत पवार, श्रीमंत पाटील या संचालकांसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने सभेस सुरवात झाली. अमोल शिंदे यांनी स्वागत केले. विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी केले. व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. ॲडव्हान्स प्राप्तिकर आणि इमारत निधीची तरतूद याला विरोध करण्यासाठी विरोधकांनी या तरतुदी रद्द करण्याचे फलक सभागृहात आणले होते. परंतु बँकेच्या मुख्य इमारतीसाठी एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या इमारत निधी तरतुदीसह सर्व विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात घोषणा देत मंजूर केले. या वेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. ३१ मार्च २०२२ अखेरचा अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रक, नफ्याची संचालक मंडळाच्या शिफारशीप्रमाणे नफा वाटणी मंजूर करण्यात आली. बँकेला इमारत, जागा, फर्निचर, संगणक व सॉफ्टवेअर खरेदीसाठी लागणाऱ्या भांडवली गुंतवणुकीस मंजुरी देण्यात आली. एकमेव विरोधी संचालक कृष्णा पोळ यांनी, नफा विभागणी करून ॲडव्हान्स प्राप्तिकर आणि इमारत फंडाच्या तरतुदीस लेखी विरोध केल्याचे सांगितले. शिंदे यांनी सभासदांच्या लेखी प्रश्नांना उत्तरे दिली. यात विरोधी गटाचे नेते सतीश पाटील यांच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. बँकेच्या उपाध्यक्ष अनिता काटे यांनी आभार मानले.

पुन्हा सभासदाची संधी...

ज्या सभासदांनी ३० जून २०२२ पूर्वी बँकेचा राजीनामा दिला होता, त्यांना पुन्हा सभासद करून घेण्यासाठी पोटनियम दुरुस्तीही करण्यात आली.

सत्ताधाऱ्यांनी सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नफ्याची वाटणी करून सभासदांच्या तोंडचा लाभांशाचा घास काढून घेतल्याचा निषेध करतो. स्वीकृत संचालकांची नियुक्ती बेकायदेशीर असून सभासदांच्या हितासाठी कायदेशीर लढाई लढू.

- शशिकांत भागवत, शिक्षक समितीचे नेते

आमच्या संचालक मंडळाच्या कारभारावर सभा होणार असल्याने सभा शांततेत पार पाडण्याचे आम्ही ठरविले होते. विद्यमान संचालकांनी मनमानी करून पावणेचार कोटींचा नफा हा ॲडव्हान्स प्राप्तिकर आणि इमारत फंडाकडे वळवला. सभासद याचा जाब विचारतील म्हणून सभा अर्ध्या तासात गुंडाळली. गरज नसताना पोलिस बंदोबस्त ठेवला. विरोधकांना पुढे येण्याची संधी दिली नाही.

- यू. टी. जाधव, माजी अध्यक्ष

सभासदांनी स्वाभिमानी शिक्षक मंडळावर विश्‍वास दाखवून सत्ता दिली आहे. येत्या पाच वर्षांत चांगला कारभार करून त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवणार आहे. त्यांच्या मागणीनुसार बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीसाठी तरतूद केली आहे. सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांनाही योग्य उत्तरे दिली आहेत. कोणतीही मनमानी केलेली नाही.

- विनायक शिंदे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक