सांगली शिक्षक बॅंक कर्जाचे व्याज कमी न केल्यास आंदोलन - शिक्षक संघ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेने कर्जावरील व्याजाचा दर तातडीने कमी करावा. अन्यथा, आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे आणि सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिला आहे. 

सांगली ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेने कर्जावरील व्याजाचा दर तातडीने कमी करावा. अन्यथा, आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे आणि सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिला आहे. 

ते म्हणाले, ""कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शिक्षक बॅंकेकडे कर्जाच्या मागणीचा ओघ कमी झालेला आहे. शिक्षक बॅंकेच्या कर्जाचा व्याजदर जास्त आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सभासद आधीच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे वळलेले आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बॅंकेत होत आहेत. त्यामुळे कर्जासाठी शिक्षकांना राष्ट्रीयीकृत बॅंक हा एक नवीन पर्याय निर्माण झालेला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांनी या सर्व संभाव्य धोक्‍यांचा विचार करून सातारा व कोल्हापूर शिक्षक बॅंकेप्रमाणे नऊ टक्के व्याज दराने शिक्षकांना कर्ज पुरवठा करावा. अन्यथा बॅंकेचे अस्तित्व धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.'' 

ते म्हणाले, ""शिक्षक बॅंकेने ठेवीवरील व्याजदर दोन ते तीन टक्‍क्‍यांनी कमी करूनसुद्धा अद्याप कर्जावरील व्याज कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे सभासदांप्रती सत्ताधाऱ्यांचे प्रेम पुतना मावशीचे आहे हे सिद्ध होते. बॅंकेमध्ये चाललेली अनावश्‍यक खर्चाची उधळपट्टी कमी केली तर निश्‍चितच सभासदांना नऊ ते दहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जाऊ शकतो. याचा सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. अन्यथा शिक्षक संघाच्या वतीने लवकरच आंदोलन छेडण्यात येईल.'' 

यावेळी शिक्षक बॅंकेचे संचालक शामगोंडा पाटील, सुधाकर पाटील, महादेव हेगडे, बाजीराव पाटील, शोभा पाटील, धनंजय नरुले यांच्यासह शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Shikshak Bank agitation if interest on loans is not reduced - Shikshak Sangh